जुने गोवे प्रस्ताव ‘ग्रेटर पीडीए’तून गुंडाळला

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

जुने गोवे पंचायत क्षेत्रातील काही भाग बृहन्पणजी नगर नियोजन प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सरकारने रद्द केला आहे.

पणजी : जुने गोवे पंचायत क्षेत्रातील काही भाग बृहन्पणजी नगर नियोजन प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सरकारने रद्द केला आहे. तो भाग वारसा स्थळे असलेल्या चर्चलगत असल्याने तेथे गगनचुंबी इमारती आल्यास त्या भागावर ताण येऊन सर्वच काही बदलण्याची निसर्गावर घाला पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्या जनभावनांची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ‘युनिसेफ’ला याविषयी ईमेलच्या माध्यमातून कल्पना दिली होती. जगातून ही वारसा स्थळे वाचवण्यासाठी संस्था संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. जुने गोवे पंचायतीच्या काही सदस्यांनीही आज त्याला विरोध केला 
होता. 

प्रा. प्रजल साखरदांडे यांनीही वारसा स्थळे वाचवावीत, असे आवाहन सरकारला केले होते. पंचायतीने आपल्या पंचायत क्षेत्रातील भाग बृहन्पणजी नगर नियोजन प्राधिकरणात समाविष्ट करू नये, तसा प्रस्ताव असल्यास तो रद्द करावा अशी मागणी केली होती.

याबाबत कवळेकर यांनी सांगितले, पंचायतीने पाठवलेल्या प्रस्तावाचा नगरनियोजन खात्याने अभ्यास केला. धार्मिक संस्था प्रमुखांनी याबाबत व्यक्त केलेल्या भावना विचारात घेण्यात आल्या. यानंतर याविषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जुने गोवे पंचायत क्षेत्रातील काही भाग बृहन्पणजी नगर नियोजन प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव गुंडाळण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे आता बृहन्पणजी नगर नियोजन प्राधिकरणात नव्या भागाचा समावेश केला जाणार नाही.

संबंधित बातम्या