राज्‍यात दरवर्षी दीड हजार कॅन्‍सरग्रस्‍त; उपचार झाल्‍यास मात शक्‍य

प्रतिनिधी
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

गोव्यात दरवर्षी सुमारे १३०० ते १५०० लोकांना कर्कराेगाची लागण होत असून त्यात स्तन कर्करोग झालेल्‍या रुग्‍णांची संख्‍या मोठी आहे. वेळीच तपासणी व उपचार झाल्यास कर्करोगावर मात करता येऊ शकते. 

पणजी : माणसाने अत्याधुनिक जीवनशैलीचा अंगिकार करून पारंपरिक अन्नाला दूर सारून फास्‍ट फूडकडे वळल्‍याने अनेक गंभीर व्याधींना निमंत्रण मिळाले आहे. कर्करोग (कॅन्सर) हा त्यापैकीच एक गंभीर रोग. गोव्यात दरवर्षी सुमारे १३०० ते १५०० लोकांना कर्कराेगाची लागण होत असून त्यात स्तन कर्करोग झालेल्‍या रुग्‍णांची संख्‍या मोठी आहे. वेळीच तपासणी व उपचार झाल्यास कर्करोगावर मात करता येऊ शकते. 

गृहिणींचे बजेट ढासळणार; एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ 

कर्करोग तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात दरवर्षी १३०० ते १५०० च्या आसपास लोक विविध प्रकारच्या कर्करोगाने बाधित होतात. त्यात महिलांची संख्या बरीच आहे. तसेच महिलांच्या स्तन कर्करोगाचे प्रमाणही २५० ते ३०० च्या आसपास आहे. बदललेली जीवनशैली कर्करोग होण्यास मुख्य कारण आहे. पहिल्या टप्प्यात तपासणी, निदान व उपचार झाल्यास कर्करोगग्रस्त व्यक्ती बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असते. दुसऱ्या टप्प्यात तपासणी, निदान व योग्य उपचार झाल्यास कर्करोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के असते. तिसऱ्या टप्प्यात तपासणी, निदान व योग्य उपचार झाल्यास कर्करोगग्रस्‍त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. तर चौथ्या टप्प्यात  तपासणी, निदान व योग्य उपचार याद्वारे कॅन्सर रुग्ण बरा होण्याचे प्रमाण अवघे १० टक्के असते अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली. 

पर्यटन विकासासाठी गोवा सरकारने मागितली केंद्राकडे मदत 

धूम्रमान, तंबाखू व मद्यपान व्‍यर्ज करून हिरव्या पालेभाज्यांचा वापर जेवणात जास्त केल्यास व घरगुती जेवण घेऊन फास्ट फुडला दूर सारल्यास कर्करोगावर मात करता येते. स्तन कर्करोग, फुफ्‍फुसाचा कर्करोग, तोंड, घसा, रक्ताचा कर्करोग यासह अन्‍य प्रकार आहेत, असे डॉ. साळकर यांनी सांगितले. 

काय सावधगिरी घ्‍याल...
गोव्यात सरासरी दरवर्षी २७० महिलांना स्तनाचा कर्करोग होतो. तो होऊ नये यासाठी महिलांचे लग्‍न २७ वा २८ व्या वर्षी व्हावे. ३० व्या वर्षी पहिले मूल व्हावे. किमान दोन मुले असावीत. महिलांनी आपल्या मुलांला किमान सहा महिने व कमाल दोन वर्षे स्तनपान करावे. ४० वर्षानंतर स्वत:च्‍या स्तनाची तपासणी करावी. गाठ आठळल्यास डॉक्टरकडे जावे व उपचार करावेत, अशी सूचना डॉ. साळकर यांनी केली.

उपचार कुठे?
राज्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी व मणिपाल इस्पितळ दोनापावल येथे कर्करोग नियंत्रणासाठी अत्याधुनिक पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत. कर्करोगाच्‍या एका शस्त्रक्रियेसाठी विविध प्रकारचे आठ डॉक्टर लागतात. ते मणिपालमध्ये उपलब्ध असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले. लवकर निदान झाल्यास कर्करोग रुग्ण लगेच बरा होतो. त्यामुळे लोकांनी दुखणे अंगावर काढू नये. तपासणी करावी, असे आवाहन डॉ. शेखर साळकर यांनी केले.

संबंधित बातम्या