जमिनीची बनावट कागदपत्रे बनविल्याप्रकरणी एकास अटक

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

बनावट कागदपत्रे बनवून जागा आपल्या मालकीची असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी शुक्रवारी उशिरा गुन्हा नोंदवून संशयित मिथुन वेर्णेकर (कोलवा) याला अटक केली.

सासष्टी: बनावट कागदपत्रे बनवून जागा आपल्या मालकीची असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी शुक्रवारी उशिरा गुन्हा नोंदवून संशयित मिथुन वेर्णेकर (कोलवा) याला अटक केली. याप्ररकणी सुरेश नावाडकर, स्वप्नील नावाडकर आणि राजेंद्र कांबळे हे संशयित फरार आहेत. 

मायणा कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक पै काणे (मालभाट) हे याप्रकरणी तक्रारदार असून त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. सांजुझे आरियल येथील सर्व्हे क्रमांक १११/१ प्लॉट क्रमांक ६६ व ६४ ही जमीन तक्रारदार दीपक यांच्या मालकीची असून चारही संशयितांनी बनावट कागदपत्रे बनवून ही जागा आपल्या नावे असल्याचे विक्रेत्यांना सांगितले, असे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे.

लोकांनी सहजच जमीन विकल्यावरून दीपकची चौकशी केली असता दीपकला बनावटीचा सर्व प्रकार समजला. संशयितांनी बनावट कागदपत्रांवर बनावट सरकारी स्टॅम्पही तयार केलेला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून मिथुन वेर्णेकर याला अटक केली, तर उर्वरित सुरेश नावाडकर, स्वप्नील नावाडकर आणि राजेंद्र कांबळे हे संशयित फरार आहेत. संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. मायणा कुडतरी पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, जमिनीची बनावट कागदपत्रे बनवून भलत्यालाच जमिनी विकण्याचे प्रकार राज्यात वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या