दुचाकी चोरीप्रकरणी एकास अटक, चार दुचाक्या जप्त

Prashant Shetye
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सासष्टी तालुक्यातील नावेली व मडगाव परिसरातल्या पार्किंग जागेत उभ्या केलेल्या दुचाकी चोरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांना संशयित सत्या तोमर (वय २५) याला अटक करून त्याच्याविरुद्ध भादंसंच्या ३७९ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी संशयिताकडून एकूण चार दुचाक्या जप्त केल्या असून न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिस संशयिताच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

सासष्टी
मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गेल्या अनेक दिवसांपासून नावेली व मडगाव परिसरातील पार्किंग जागेतून महागड्या दुचाक्या चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. शुक्रवारी लॅरिता रॉड्रगीस यांनी नावेली पार्किंग जागेत ठेवलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी त्वरित तपास करून संशयिताला अटक केली. चौकशी दरम्यान संशयिताने नावेली तसेच मडगाव शहरातूनही दुचाकी चोरल्याचे कबूल केले, त्यानुसार पोलिसांनी एकूण चार चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत.
संशयिताकडे वेस्पा कंपनीची दुचाकी असून संशयित वेस्पाच्या दुचाक्या चोरून त्यावर स्वतःच्या दुचाकीची नंबर प्लेट लावून स्वतःसाठी त्यांचा वापर करत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आज शनिवारी नावेली परिसरातून संशयिताला अटक केली. संशयितावर चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयिताबरोबर आणखी साथीदारही गुंतलेले असून पोलिस त्यांचाही शोध घेत आहे. मडगाव पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, फातोर्डा पोलिसांनी पार्किंग जागेत ठेवलेल्या दुचाक्या चोरल्याप्रकरणी संशयित प्रकाश उर्फ आलेक्स परियार (वय ३६, अंबाजी) या अट्टल चोरट्याला अटक केली असून संशयितावर मायना कुडतरी, मडगाव तसेच कोलवा पोलिस स्थानकातही अनेक गुन्हे नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या