गोव्यातून दररोज एक टन भाजी बेळगावला; फलोत्पादन महामंडळाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल,

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

 हिरवी मिरची, वांगी, चिटकी, भेंडी, पांढरा भोपळा या भाज्यांच्‍या उत्पादनात गोव्यातील शेतकऱ्यांनी सध्या गरुडभरारी घेतली आहे. दर दिवशी एक टन भाजी बेळगावच्या भाजी मार्केटमध्ये पाठवण्यात येत आहे.

कोलवाळ :  हिरवी मिरची, वांगी, चिटकी, भेंडी, पांढरा भोपळा या भाज्यांच्‍या उत्पादनात गोव्यातील शेतकऱ्यांनी सध्या गरुडभरारी घेतली आहे. दर दिवशी एक टन भाजी बेळगावच्या भाजी मार्केटमध्ये पाठवण्यात येत आहे. गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी यासंदर्भात दुजोरा दिला आहे. गोवा फलोत्पादन महामंडळाची वाटचाल स्वयंपूर्णतेकडे झेपावत आहे. गोमंतकीयांनी अन्य राज्यांतून येणाऱ्या भाज्यांवर अवलंबून न राहता पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तिन्ही मौसमांत गोव्यातील शेतकरी पिकवीत असलेल्‍या भाज्यांचा जास्तीत जास्त उपयोग स्वत:च्या रोजच्या आहारात केल्यास हळूहळू अन्य राज्यांतून येणाऱ्या भाज्यांची मागणी कमी होणार आहे. गोव्यात दर दिवशी सुमारे ८० टन भाज्यांची मागणी आहे. भाजी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दुप्पट पीक देणारी भाज्यांच्या बियाण्यांची पन्नास टक्के सवलतीने शेतकऱ्यांना विक्री केली जाते. दरवर्षी सुमारे तीनशे ते पाचशे किलो बियाणे शेतकऱ्यांना वितरित केली जातात. या वर्षी भाजी उत्पादनाबाबत शेतकऱ्यांनी कमालीचा उत्साह दाखवून दीड हजार किलो भाज्यांची बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेतली आहेत.

वादग्रस्त गोवा रेल्वे प्रकल्पांला वन विभागाची मंजुरी

शेतकऱ्यांनी मोठा उत्साह दाखवून चिटकी, हिरवी मिरची, भेंडी, वांगी, दुधी भोपळा या भाज्यांच्या उत्पादनात कमालची वाढ केली आहे. शेतकरी दर दिवशी कृषी खात्याच्या म्हापसा विभागीय कार्यालयात सरासरी सहाशे किलो भाजीची विक्री करतात. भाज्यांच्‍या मागणीनुसार बार्देश तालुक्यातील फलोत्पादन महामंडळाच्या भाजी विक्रेत्यांना भाजी पुरवली जाते. त्यामुळे गोव्यात भाजी उत्पादनात शेतकरी मोठी झेप घेत असल्याचे स्पष्ट होते. बार्देश तालुक्यात फलोत्पादन महामंडळाची सुमारे अडीचशे भाजी विक्रीची दुकाने आहेत. गोव्यातील शेतकऱ्यांनी कांदे, बटाटे व टॉमेटोच्या लागवडीला सुरवात केली आहे; तथापि, त्या उत्पादनासाठी गोव्याचे हवामान तेवढेसे पोषक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे कांदे, बटाटे व टॉमेटो यांची खरेदी अन्य राज्यांतून करावी लागते. गोव्यातील लोकांनी स्वत:च्या रोजच्या आहारात गोव्यात उत्पादित होणार्‍या भाज्यांना प्राधान्य दिल्यास कांदे, बटाटे, टॉमेटो यांची परराज्यातून आवक करणे हळूहळू कमी होणार आहे. पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा सर्व मौसमांत होणाऱ्या गोव्यातील भाज्यांचा उपयोग जास्त प्रमाणात करण्याची गरज आहे, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गोव्यात गेल्या 24 तासांत 54 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; लसीकरण मोहिम वेगवान

बेळगाव येथील भाजी बाजारपेठेवर अवलंबून न राहता गोव्यात उत्पादन होणाऱ्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात फलोत्पादन महामंडळाच्या विक्री केंद्रांवर उपलब्ध केल्यास लोकांना ताज्या व चांगल्या भाज्या मिळणार आहेत, असेही त्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. धारबांदोडा येथील शेतकरी वरद सावंत यांनी या मौसमात सत्तर टन कोबीची बाजारपेठेत विक्री केली आहे. गोव्यात या भाजीच्या उत्पादनाला पोषक वातावरण असल्यामुळे कोबी लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. गोव्यात उत्पादित होणाऱ्या मुळा, तांबडी भाजी, गड्डे, वांगी, भेंडी व अन्य भाज्या बाजारात भरपूर प्रमाणात येत आहेत. लोकांनी त्या भाज्यांचा उपयोग रोजच्या आहारात केल्यास अन्य भाजांची मागणी कमी होणार आहे. गोव्यात उत्पादित होणाऱ्या भाज्यांच्या दररोजच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होणार आहे. तसेच, गोवा फलोत्पादन महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रांचेही आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

 गोव्यातील साळगावचे हळसांदे, मयडेची मंडोळी केळी, खोल, हळदोणे, हरमलची मिरची, ताळगाव व आगशीची वांगी, सांतइस्तेव्हची भेंडी अशा प्रकारे परंपरागत कृषी लागवड केली जाते. गोव्‍यात शेतकऱ्यांनी भाजी उत्पादनावर भर दिल्यास गोव्यात भाज्यांच्या उत्पादनात क्रांती घडवणे शक्य आहे."

-संदीप फळदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, गोवा फलोत्पादन महामंडळ.

संबंधित बातम्या