प्‍लाझ्‍मादात्या कुटुंबातील सदस्‍यांना वर्षभर मोफत तपासणीची सुविधा: विश्‍वजित राणे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

जी व्यक्ती प्लाझ्मादान करण्‍यासाठी पुढे येईल, त्याच्या कुटुंबातील सदस्‍यांची वर्षभर आरोग्यखाते आरोग्‍य तपासणी करण्‍याची विशेष सुविधा देईल.

पणजी: कोरोनाविषयी लोक जर काळजी घेत नसतील, तर त्याचा फैलाव होतच राहील. त्यासाठी लोकांनी मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीत जाण्याचे टाळावे, तरच कोरोनाचा प्रसार रोखला जाईल. तसेच जी व्यक्ती प्लाझ्मादान करण्‍यासाठी पुढे येईल, त्याच्या कुटुंबातील सदस्‍यांची वर्षभर आरोग्यखाते आरोग्‍य तपासणी करण्‍याची विशेष सुविधा देईल. त्याचबरोबर अनेक लोक कोरोनाची लक्षणे गंभीर दिसू लागल्यानंतर उपचारासाठी येत असल्याने निदर्शनास आले आहे, ही चिंतेची बाब असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.  

आरोग्य संचालनालयाने तयार केलेल्या कोरोनाविषयीच्या तज्‍ज्ञांच्या समितीची आठवडा बैठक झाल्यानंतर त्याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. उदय काकोडकर, डॉ. दुर्गा लवंदे, डॉ. व्ही. गावकर, डॉ. गीता काकोडकर, डॉ. उत्कर्ष यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते. 

रुग्णावर सर्वाधिक खर्च
आरोग्‍यमंत्री राणे म्हणाले की, गोवा हे एकमेव असे राज्य आहे की सर्वांत जास्त कोरोनाच्या रुग्णावर पैसा खर्च करीत आहे. आम्ही एकाही रुग्णाकडून एक रुपयाही घेत नाही. सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. आम्ही उच्च दर्जाच्‍या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा त्यासाठी करीत आहोत. राज्यातील कोणत्याही खासगी रुग्णालयापेक्षा अधिक रक्कम सरकारी रुग्णालयात रुग्णावर खर्च केली जात आहे. रुग्ण वाढत असल्याने आम्ही गोमेकॉतील १२२ क्रमांकाचाही वॉर्ड आता त्यासाठी राखीव केला आहे. 

सावधगिरी बाळगा
सध्या जे काही रुग्णांचा मृत्यू होत आहे, त्यात इतर रोगांमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. पाच ते दहा दिवस अंगात ताप राहिल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी रुग्णाला रुग्णालयात रुग्णाला दाखल करतात. त्यामुळे अनेकवेळा उपचार करणे अडचणीचे होते, असेही राणे म्हणाले. अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सामाजिक अंतर राखत नाहीत, हे आपण स्वतः अनुभवले आहे. कोरोना हा आजार माणसाला मारणारा आहे, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

प्रतिदिन सहा ते सातजणांकडून प्‍लाझ्‍मादान : डॉ. बांदेकर
आरोग्य संचालनालयाने तयार केलेल्या कोरोनाविषयीच्या तज्‍ज्ञांच्या समितीची आठवडा बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी इतर रोगामुळे व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दिवसाला सहा ते सातजण प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत असल्याबद्दल ती आनंदाची बाब आहे. आज सातजणांनी प्लाझ्मा दिल्याचे त्यांनी सांगितले. गोमेकॉत १४५ वॉर्डमध्ये ३३, १४६ मध्ये अतिशय गंभीर २१, १४७ मध्ये ३३, १४८ मध्ये ४२, १५० मध्ये ३४, १३२ मध्ये १० आणि १२२ मध्ये १२ एकूण १८५ रुग्ण आहेत. ईएसआयमध्ये १८६ आणि फोंड्यामध्ये ६० रुग्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कोरोनामुळे गोमेकॉत आतापर्यंत ८८ जणांचा मृत्‍यू
गोमेकॉमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत ८८ जणांचा, त्यापैकी ७९ जणांचा इतर रोगामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील अनेकजणांचा मृत्यू शेवटच्या २४ तासांत दवाखन्यात दाखल झाल्यानंतर झाला आहे. ईएसआय रुग्णालयात ११५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १०२ जणांचा इतर रोगामुळे मृत्यू झाला आहे. इतर रोगांमुळे मृत्यू होण्यामागे त्या व्यक्तीचा इतर आजार कारणीभूत आहे, असे डॉ. बांदेकर म्हणाले. याप्रसंगी डॉ. बांदेकर यांनी मागील वर्षातील आणि यावर्षातील जून ते ऑगस्ट दरम्यान गोमेकॉमध्ये मृत्यू झालेली आकडेवारी विषद केली. ती पुढील प्रमाणे : 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या