स्‍वस्‍त दरातील कांदा फलोत्‍पादनच्‍या स्‍टॉलवर उपलब्‍ध करावा : आमोणकर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गोमंतकीय जनतेला स्वस्त धान्य दुकानातून नव्हे, तर फलोत्पादन महामंडळाच्या दुकानातून स्वस्तात कांदा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना काँग्रेस नेते तथा फलोत्पादन महामंडळाचे माजी अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी सरकारला केली आहे.

मुरगाव: गोमंतकीय जनतेला स्वस्त धान्य दुकानातून नव्हे, तर फलोत्पादन महामंडळाच्या दुकानातून स्वस्तात कांदा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना काँग्रेस नेते तथा फलोत्पादन महामंडळाचे माजी अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी सरकारला केली आहे.

कांद्याचा दर गगनाला भिडल्याने याचा विपरीत परिणाम गोमंतकीय जनतेवर झालेला आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेऊन प्रति किलो ३२ रुपये या दराने राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून कांदा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यावर श्री. आमोणकर यांनी आपले मतप्रदर्शन करताना कांदा फलोत्पादन महामंडळाच्या दुकानातून जनतेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

गोव्यातील सर्वच लोकांकडे रेशनकार्ड नाहीत, त्यामुळे अनेकांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्तात कांदा खरीदता येणार नाही. त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या लोकांवर अन्याय होईल, असे श्री. आमोणकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणून देऊन कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊन फलोत्पादन महामंडळाच्या दुकानातून कांदा विक्रीस उपलब्ध करावा, अशी सूचना सरकारला केली आहे. सरकारने प्रति रेशनकार्ड मागे प्रत्येकी तीन किलो कांदा देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे एवढा कांदा स्वस्त धान्य दुकानधारक कुठे साठवून ठेवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोव्यातील एकेका स्वस्त धान्य दुकानचालकांकडे हजारांहून अधिक रेशनकार्डे नोंद आहेत. त्यामुळे किमान तीन हजार किलो कांदा विक्रीसाठी उपलब्ध करावा लागणार आहे. प्रत्येकी २५ किलो वजनाची कांद्याची पिशवी असते. जर तीन हजार किलो कांदा दुकानात विक्रीसाठी ठेवल्यास केवढी मोठी जागा उपलब्ध करावी लागणार, याचा सरकारने अभ्यास करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या