निर्यातबंदीतही कांद्याला भाव

वार्ताहर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पारनेर बाजार समितीत ५१०० रुपये क्विंटलने विक्री

पारनेर: केंद्र सरकारच्या निर्यातबंदीनंतरही येथील बाजार समितीत आज क्रमांक एकच्या कांद्यास थेट पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर कांदा भाव खाऊन गेला.

बाजार समितीत आज १३ हजार ३३० कांदागोण्यांची आवक झाली. आवक जास्त होऊनही दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच क्रमांक एकच्या कांद्यास क्विंटलमागे ५१०० रुपये, क्रमांक दोनच्या कांद्याला ३४०० ते ४२०० रुपये भाव मिळाला. अद्याप तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात साठविलेला कांदा शिल्लक आहे. सध्या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कांदालागवडी सुरू आहेत. लॉकडाउनमुळे मध्यंतरी काही दिवस कांदा बाजार बंद होता. हॉटेले बंद होती. त्यामुळे कांद्याचे भाव थेट पाच ते सहा रुपये किलोवर आले होते.

लॉकडाउनमुळे बाजार समित्यांचे खरेदी-विक्री व्यवहार तब्बल अडीच महिने बंद करण्यात आले. लॉकडाउन काळात व त्यानंतर बाजार समितीत कांद्याचे जाहीर लिलाव सुरू झाल्यावर भाव मोठ्या प्रमाणात कोसळले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यातून कांदालागवडीचा खर्चही वसूल होत नव्हता. आता मात्र कांद्याचे बाजार हळूहळू वाढू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

राज्यातील सर्वच व्यवहार सुरळीत होत आहेत. कांदा बाजारही सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीची घाई करू नये. बाजार आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चांगला माल विक्रीसाठी आणावा. परस्पर शेतात कांदाविक्री करू नये; फसवणूक होण्याची शक्‍यता आहे.
- प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर

 

संबंधित बातम्या