कांद्याचा दर पुढील दोन आठवड्यात रुपयांचे द्विशतक गाठण्याची शक्यता!

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

केंद्र सरकारने निर्यात बंदी न उठवल्याने साठवलेल्या कांद्याला दर येऊ शकतो. आत्ता बाजारात येणारा कांदा पूर्णपणे प्रतवारी घसरलेला असला तरी तो भाव खात आहे. त्यामुळे साठवलेला कांदा जर विक्रीस बाहेर काढण्यास वेळ लागला तर कांद्याचे दर २०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे स्पष्ट चित्र आहे. 

पणजी : सध्या कांद्याने बाजारात शंभरी गाठली आहे. पुढील दोन आठवड्यात हा दर द्विशतक पार करेल, अशी भीती आहे. कारण शेजारील राज्यात कांदा पीक पावसामुळे वाहून गेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यात बंदी न उठवल्याने साठवलेल्या कांद्याला दर येऊ शकतो. आत्ता बाजारात येणारा कांदा पूर्णपणे प्रतवारी घसरलेला असला तरी तो भाव खात आहे. त्यामुळे साठवलेला कांदा जर विक्रीस बाहेर काढण्यास वेळ लागला तर कांद्याचे दर २०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे स्पष्ट चित्र आहे. 

राज्यात कांदा, बटाटा, टोमॅटो अशी भाजीपाला पिके परराज्यातूनच येतात. गोव्याला पूर्णतः त्यासाठी इतर राज्यांच्या बाजारपेठांवर अवलंबून रहावे लागते. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे कांदा दोनशेच्या घरात गेला होता, तेव्हा राज्य फलोत्पादन महामंडळाला शंभर रुपयांच्या आत दर ठेवून विक्री करावा लागला होता. राज्य सरकारला आलेला हा अनुभव पाहता महामंडळाने आत्तापासूनच काहीतरी उपाययोजना कराव्यात. खासगी बाजारातील दरांवर कोणाचेच नियंत्रण नाही, व्यापारी ठरवतील त्या दराने ग्राहकाला कोणतीही वस्तू खरेदी करावी लागते आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. 

शेजारील राज्यांतून कांदा बाजारात येतो. गोव्यासाठी बेळगाव ही बाजारपेठ महत्त्वाची असली तरी कांदा-बटाट्याकरिता कोल्हापूर, नाशिक (लासलगाव) अशा ठिकाणाहूनही येथील व्यापारी त्याची आयात करतात. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकात नुकत्याच झालेल्या पावसामुळे इतर पिकांबरोबर कांदा पीकही पूर्णपणे धोक्यात आले आहे. त्यामुळे यंदा लागवड केलेल्या कांद्याचे उत्पादन  उन्हाळ्यात म्हणावे तेवढे निघणार नाही, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला असल्याने तो बाहेर काढत नाहीत, जोपर्यंत हा कांदा बाहेर येत नाहीतोपर्यंत त्याचे दर कमी होणे शक्य नाही. बाजारात कांद्याची आवक वाढलीतरच दर खाली येतील, पण तसे चित्र सध्यातरी काही दिसत नाही.

संबंधित बातम्या