रेशनवरील कांद्याचे वितरण आजपासून सुरू

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

स्वस्त धगन्य दुकानातून अखेर आजपासून (सोमवार) रेशनवर कांद्याचे वितरण सुरू झाले असून, डिचोलीत आज तरी कांदा खरेदीला अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळालेला नाही. स्वस्त धान्य दुकानांमधून ३४.५० रुपये प्रति किलो या दराने कांद्याची विक्री करण्यात येत आहे.

 डिचोली: स्वस्त धगन्य दुकानातून अखेर आजपासून (सोमवार) रेशनवर कांद्याचे वितरण सुरू झाले असून, डिचोलीत आज तरी कांदा खरेदीला अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळालेला नाही. स्वस्त धान्य दुकानांमधून ३४.५० रुपये प्रति किलो या दराने कांद्याची विक्री करण्यात येत आहे. दुसऱ्याबाजूने फलोत्पादन महामंडळानेही आता कांद्याचे दर उतरविले आहेत. बाजारात मात्र कांद्याचे वाढलेले दर स्थिर आहेत. 

दरम्यान, रेशनवर स्वस्त दरात मिळणाऱ्या एक किलो कांद्याने काय होणार? असा प्रश्‍न गृहिणींकडून उपस्थित करण्यात येत आहे. दैनंदिन आहारातील घटक असलेल्या कांद्यांचे दर वाढल्यानंतर विशेष करून गृहिणींना दिलासा मिळण्यासाठी रेशनवर स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. राज्यातील शिधापत्रधारकांना प्रति ३२ रुपये याप्रमाणे ३ किलो कांदा वितरीत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर सामान्य गृहिणींना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र नंतर ३४.५० रुपये दराने रेशनवर फक्‍त एक किलोच कांदा वितरीत करण्यात येणार, असा आदेश नागरीपुरवठा खात्याने काढला आणि त्याप्रमाणे आता रेशनधारकांना प्रति एक किलो याप्रमाणे कांदा वितरीत करण्यात येत आहे.

स्वस्त दरात कांदा वितरीत करण्यात येत असल्याने स्वस्त धान्य दुकानांनी ग्राहकांची गर्दी होणार. अशी अपेक्षा होती. मात्र, डिचोलीतील बहूतेक स्वस्त धान्य दुकानांतून तसे चित्र दिसून आले नाही. फक्‍त एक किलो आणि त्यातच रेशनवरील कांदा चांगल्या प्रतीचा असेलच, याबद्‌दल शाश्वती नसल्याने हा कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत नसल्याचे समजते. 

‘फलोत्पादन’चा कांद्याचा दर उतरला...!
एकाबाजूने रेशनवरील कांद्याचे वितरण सुरू झाले असतानाच, दुसऱ्याबाजूने फलोत्पादन महामंडळानेही कांद्याचे दर कमी केले आहेत. कालपर्यंत महामंडळाच्या आऊटलेटवर ६६ रुपये प्रति किलो या दराने कांद्याची विक्री करण्यात येत होती. आजपासून आऊटलेटवर ५४ रुपये किलो या दराने कांद्याची विक्री करण्यात येत आहे. किरकोळ बाजारात मात्र कांद्याचे वाढलेले दर स्थिर आहेत. सोमवारी बाजारात ८० रुपये प्रति किलो या दराने चांगल्या प्रतीचा कांदा विकण्यात येत आहे.

"महागाई वाढल्याने जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करताना जनतेच्या कपाळाला आट्या पडत आहेत. अशावेळी रेशनवर स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देणे. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, एक किलो कांदा दिला म्हणून प्रश्‍न सुटणार नाही. एक किलो कांद्याने काहीच होणार नाही. किमान प्रति रेशनमागे ४ ते ५ किलो कांदा वितरीत करणे आवश्‍यक आहे. रेशनवरील कांदाही चांगल्या प्रतीचा असावा. "
- मेघना येंडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य. 
 

संबंधित बातम्या