कांद्याची जागा घेतली कोबीने!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

एक कप चहासोबत ऑफिसजवळच्या टपरीवर उभं राहून कांदा भजीवर ताव मारला की पोटाचे काम फत्ते होते. मात्र, कांदा १०० रुपयांवर पोहोचल्‍याने तो परवडेनासा झाला. त्‍यामुळे हॉटेलवाल्‍यांनी जुगाड करत कांदाभजीमध्‍ये कांद्याऐवजी कोबीचा समावेश केला.

पणजी  : सायंकाळच्‍यावेळी पेटपूजा करण्‍यासाठी चहाबरोबर खाण्यासाठी झणझणीत, चमचमीत एखाद्या पदार्थाची आठवण येत असेल तर ती कांदाभजी. एक कप चहासोबत ऑफिसजवळच्या टपरीवर उभं राहून कांदा भजीवर ताव मारला की पोटाचे काम फत्ते होते. मात्र, कांदा १०० रुपयांवर पोहोचल्‍याने तो परवडेनासा झाला. त्‍यामुळे हॉटेलवाल्‍यांनी जुगाड करत कांदाभजीमध्‍ये कांद्याऐवजी कोबीचा समावेश केला. मात्र, अस्सल खवय्‍ये बिघडलेली भजीची चव चाखल्यावर हिरमुसले होत आहेत. 

कांद्याच्या दराने शंभरी गाठल्यामुळे अनेक हॉटेलचालक पैसे वाचविण्यासाठी हा जुगाड करीत आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे कित्येक महिने हॉटेल बंद होती. ज्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीचे वेध हॉटेलचालकांना लागले आहेत. त्यामुळे जेवणाच्या ताटासोबत दिल्या जाणाऱ्या सॅलडमधूनसुद्धा कांदा वजा करण्यात आला आहे. गाजर, कोबी आणि बिट असे मिश्रण आता ग्राहकांनी सॅलड मागितल्यावर दिले जात आहे. काही ठिकाणी कांदा हवा असल्यास वेगळे पैसेसुद्धा आकारले जात आहेत. राज्यातील अनेक हॉटेलमध्ये भजीच्या मिश्रणात ८० टक्के कोबी आणि केवळ २० टक्के कांद्याचा समावेश केला जात आहे. ज्यामुळे भजीची मुख्य ओळख म्हणजेच कुरकुरीतपणा गायब झाला आणि भजी मऊ लागत आहेत. वडापावसारख्या खाद्यपदार्थांमध्ये आणि हॉटेलमध्ये मिळणाऱ्या इतर भाज्यांमध्येसुद्धा कांदा नावाला वापरला जात आहे. हॉटेल चालकांच्यामते, कांद्याचा दर १०० रु असल्याने कांदाभजीमधून एका प्लेटला सुमारे ३ कांदे वापरणे परवडत नाही. एक कांदा सुमारे ८ ते ९ रुपयांना पडतो आणि कांदा भजीच्या एका प्लेटची किंमत सुमारे ३० रुपये तरी आहे. कांदा वापरून भजी करणे म्हणजे ‘चार आण्याच्या कोंबडीला बारा आण्याचा मसाला’ या उक्तीसारखे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

संबंधित बातम्या