दिवाळी भेट म्हणून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना कांदे, टोमॅटो

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

काँग्रेस पक्ष प्रत्येक नागरिकाला पंचवीस रुपयेप्रमाणे दोन किलो कांदे देत असून सरकार जोवर दर कमी करीत नाही, तोपर्यंत महिला काँग्रेस प्रत्येक गावात रस्त्यावर बसून नागरिकांना स्वस्तात कांदे विक्री करीत राहणार असल्याची घोषणा राज्य महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.

कुडचडे : राज्यातील कांद्याची वाढता दर पाहता सरकारचे कसलेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत असून वाढत्या महागाई विरोधात सतत आवाज काढणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या महिला आता गप्प का राहिल्या आहेत असा सवाल करून रेशनकार्डवर तीन किलो कांदे स्वस्त दरात देणार म्हणून घोषणा करणारे सरकार आपली भूमिका त्वरित बदलून तीन किलोऐवजी एक किलो कांदे देत आहे, तर काँग्रेस पक्ष प्रत्येक नागरिकाला पंचवीस रुपयेप्रमाणे दोन किलो कांदे देत असून सरकार जोवर दर कमी करीत नाही, तोपर्यंत महिला काँग्रेस प्रत्येक गावात रस्त्यावर बसून नागरिकांना स्वस्तात कांदे विक्री करीत राहणार असल्याची घोषणा राज्य महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.

सावर्डे मतदारसंघातील सावर्डे - तिस्क येथे आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कांदे विक्री करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सचिव रिजेल डिसोझा, कुडचडे महिला गट अध्यक्ष रोशन, अमीना शेख, फिडोल, अली शेख, सावर्डे गट अध्यक्ष श्याम भंडारी, युवा अध्यक्ष संकेत भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रतिमा कुतिन्हो पुढे म्हणाल्या, की आज जे काँग्रेस पक्षाच्या महिला कार्य करीत आहे ते काम सरकारने करायला हवे होते, पण या सरकारला आणि सरकारच्या महिलांना महागाईची झळ अजूनही बसत नाही. काँग्रेस सरकार असताना भाजप महिला आंदोलन करून उर बडवीत होत्या. आज त्याच महिला कांद्याविना जेवण बनविण्याचा सल्ला महिलांना देत आहेत. कांद्याविना जेवण रुचकर होत असल्यास भाजपच्या महिलांनी राज्यभर प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नवे प्रतिकात्मक आंदोलन सुरू करावे.

सरकार जोपर्यंत कांद्याचे भाव कमी करीत नाही, तोपर्यंत महिला काँग्रेस कार्यकर्त्या गोवाभर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीची भेट म्हणून राज्यपाल आणि मुख्यामंत्र्यांना कांदे, टोमॅटो भेट देण्यासाठी महिला काँग्रेस गेली असता आम्हाला आत प्रवेश देण्यात आला नाही. उलट तीनशे पोलिस आणून महिला काँग्रेसची अडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली.
श्याम भंडारी म्हणाले, की कांदे महाग झाले म्हणून सरकार रेशनकार्डवर एक किलो कांदे देते, मग राज्यात मासळी, चिकन, मटण महाग झाले आहे तेसुद्धा सरकारने पुरवावे. सावर्डे मतदारसंघातील जनता खाणबंदीमुळे मेटाकुटीस आली असताना भाजप दिवाळीच्या निमित्ताने जनतेला गुळ आणि पोहे वितरण करीत आहे.

संबंधित बातम्या