सांगे भागात ऑनलाईनचे तीन तेरा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

सांगे भागातील ऑनलाईन शिक्षणाला ‘खो’ बसत असून विद्यार्थ्यांची होणारी परवड दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. अद्यापही या कारभारात सुधारणा घडून येत नसल्याने पालकांत तीव्र नाराजी पसरली असून, संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

सांगे : सांगे भागातील ऑनलाईन शिक्षणाला ‘खो’ बसत असून विद्यार्थ्यांची होणारी परवड दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. अद्यापही या कारभारात सुधारणा घडून येत नसल्याने पालकांत तीव्र नाराजी पसरली असून, संतापही व्यक्त करण्यात येत आहे. 

शिक्षणखाते ऑनलाईन शिक्षण पुरवीत आहे. पण, त्याचा हवा तसा फायदा विद्यार्थ्यांना होत नाही. परिणामी जीव धोक्यात घालून विद्यार्थी रेंज मिळेल म्हणून जंगलातील उंचवट्यावर जात आहेत. यात काही विपरीत घडल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्‍न आता पालकांतून विचारला जात आहे. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष न घातल्यास भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

 
सांगे शहरातील काहीसा भाग वगळता इतर सर्व ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. सांगेच्या कोणत्याही भागात ऑनलाईन शिक्षण घेण्यासारखी रेंज मिळत नाही. सकाळी उठल्यापासून विद्यार्थी रेंजसाठी धडपडत आहेत. यात पालकांची विद्यार्थी घरी येईपर्यंत घालमेल सुरू असते. प्राथमिक स्थरापासून ते उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी दिवसभर हातात छत्री, मोबाईल घेऊन भटकत असतात. एकट्या-दुकट्या मुलांना सोडून जाणे पालकांना सहन होत नसून, शिक्षणाची होणारी हेळसांड पाहता सरकारला दोषी धरण्यात येत आहे. 

सरकार ही सेवा सुरळीत करू शकत नसल्यास ती बदलून दुसरी सेवा उपलब्ध करून का देत नाही, हा प्रश्न पालक विचारीत आहेत. कदाचित उद्या ऑनलाईन शिक्षणासाठी जंगलात आणि तेही अशा संततधार पावसात जात असताना काही बरे वाईट घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का, की सरकार त्याच घटनेची प्रतीक्षा करीत आहे, असा प्रश्न पालकांतून विचारला जात आहे.  

गावात रेंज मिळेना म्हणून जंगलाचा रस्ता धरला. सांगेतील कुमारी भाटी गावातील स्थितीही इतर गावा सारखीच बनली आहे. गावात रेंज नाही म्हणून गावातील वीस पंचवीस विद्यार्थी गावापासून दोन किमी लांब जंगलात जाऊन उघड्या माळरानावर जाऊन बसत आहेत. कधी सरपटणारे साप दृष्टीस पडतात तर कधी जनावरे. अशा भीतीयुक्त जागी जाऊन शिक्षक जे काही ऑनलाईन धडे देतात त्याचा उतारा लिहून काढतात. हा अनुभव पणजीत बसणाऱ्यांना कधी लक्षात येणार? असा प्रश्‍न पालकांनी उपस्थित केला आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू केले. पण, त्या शिक्षणाच्या अडचणी कोणी सोडवायच्या, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या पालकांनी सरकारला विचारला 
आहे. 

पालकांची होतेय घालमेल...
सकाळी साडे आठ वाजता घरातून बाहेर पडणारे विद्यार्थी दुपारी दोन वाजता घरी परतत असतात. जोपर्यंत आपला मुलगा घरी परतत नाही, तोपर्यंत पालकांची घालमेल सुरू असते. ऑनलाईन शिक्षणाच्या नादात धड कामावर लक्ष नाही आणि धड घरातही थांबता येत नाही, अशी विद्यार्थ्यांच्या पालकांची परिस्थिती आहे. म्हणून शिक्षण खाते, भारतीय दूरसंचार निगम आणि खास करून शिक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे भागातील विद्यार्थी आणि पालकांची परिस्थिती समजून घेण्यासाठी एकवेळा खास दौरा करावा, अशी मागणी सांगे भागातील पालकांनी केली आहे.

संबंधित बातम्या