वाळपईतील जवाहर नवोदयमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू

पद्माकर केळकर
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, वाशी, धुळे, उस्मानाबादहून खास अध्यापन, ९५ टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग

वाळपई येथील जवाहर नवोदय विद्यालयात सध्या नियमितपणे ऑनलाईन पद्धतीने अध्यापनाचे कार्य सुरू असून या वर्गांना ९५ टक्के विद्यार्थी उपस्थित असतात. शाळेत वर्ग बंद असले तरीसुद्धा या निवासी विद्यालयात कोरोनामुळे यंदा विद्यार्थी आले नाहीत. परंतु ते आपल्या घरातून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

सिंधुदुर्ग, वाशी, धुळे, उस्मानाबाद अशा महाराष्ट्रातील चार नवोदय विद्यालयाचे ऑनलाई पद्धतीने वाळपईतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे मुलांना नेमकेपणाने शिक्षण मिळत आहे. हे वर्ग वेळेत होण्यासाठी, नेमकेपणाने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी प्राचार्य,  शिक्षक वर्गातर्फे नियोजन करण्यात आले आहे. 

शिकविणे बंद होऊ नये, असा विडाच उचलून नवोदयचे शिक्षकांनी सेवेचा कानमंत्रच जपला आहे. उन्हाळ्याची पूर्ण सुट्टी शाळेतच अडकून पडलेल्या शिक्षकांनी १५ जूनपासून विद्यार्थी व पालकांना देखील ऑनलाईन पद्धतीची माहिती दिली, त्यानंतर शिक्षण सुरू केले. सत्तरी, डिचोली, पेडणे तालुका अशा उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांना या शाळेतर्फे शिक्षण दिले जाते. या विद्यालयात सहावी ते १२ पर्यतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु यंदा कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत गेलेच नाहीत आणि शिक्षक सुटीतही आपल्या घरी गेले नाहीत. सुटी संपल्यानंतर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या.

१९ जून रोजी सहावी इयत्तेसाठी नवोदयच्या प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाला. ६८ मुलांची निवड सूची आली होती. प्रत्यक्षात मात्र ३२ विद्यार्थांनी प्रवेश घेतला. पन्नास टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असून देखील प्रवेश घेऊ शकले नाही. त्यामुळे सहावीच्या वर्गासाठी लवकरच नवी यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती विद्यालयातर्फे देण्यात आली. इयत्ता नववीसाठी पंधरा विद्यार्थांना उर्वरीत जागांवर प्रवेश मिळाला. 

जुलैअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली होती. ६ वी व ११वीचे वर्ग इतर वर्गासोबत १ ऑगष्टपासून नियमित सुरु झाले आहेत. विद्यालयात उपलब्ध असलेल्या स्मार्ट क्लासच्या माध्यमातून लॅपटॉप, संगणकाच्या सहाय्याने शिक्षण सुरू झाले. ऑगष्टच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाईन पी.डब्यू.टी आणि युटी चाचणी परिक्षा घेण्यात आली आहे. त्यात मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. 

सध्या प्राचार्य म्हणून मारुती भेंडवडेकर हे  पदभार संभाळत आहे. मागील वर्षी झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे विज्ञान, गणित, इंग्रजी, सामाजिक विज्ञान या विषयासाठी शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे ऑनलाईन वर्गासाठी वाळपई नवोदयच्या विद्यार्थ्यांना पुणे विभागातील शिक्षक शिकवत आहेत.

संबंधित बातम्या