वास्कोत पत्त्यांचा आणि ऑनलाईन जुगार तेजीत

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

वास्को शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून पत्त्यांचा तसेच ऑनलाईन मटका जुगार तेजीत चालल्याची माहिती मिळाली आहे. ह्या बेकायदेशीर धंद्याविषयी पोलिसांना खडानखडा माहिती असून सुद्धा तेरी भी चूप,मेरी भी चूप करुन पोलिस गप्प बसले आहेत.

मुरगाव:  वास्को शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून पत्त्यांचा तसेच ऑनलाईन मटका जुगार तेजीत चालल्याची माहिती मिळाली आहे. ह्या बेकायदेशीर धंद्याविषयी पोलिसांना खडानखडा माहिती असून सुद्धा तेरी भी चूप,मेरी भी चूप करुन पोलिस गप्प बसले आहेत.

   लाॅकडाऊनमुळे मटका जुगार बंद होता ,तो गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जोमाने सुरू झाला आहे.गेल्या लाॅकडाऊन काळात मटका जुगाराचे नाव नव्हते, पण पत्त्यांचे जुगार अड्डे चालविणाऱ्यांनी जुगार खेळणाऱ्यांची सोय केली होती त्यामुळे वास्को भाजी मार्केट तसेच अन्य परिसरात बिनधास्त पणे पत्त्यांचा जुगार चालला होता.सध्याच्या वातावरणात वास्कोत जुगारी अड्डे तेजीत चाललेले आहे.या जुगारी अड्ड्यांवर जुगार खेळणाऱ्यांची भाऊगर्दी असते अशी माहिती मिळाली आहे.

   रमी खेळाच्या नावाने तीन पत्ती, फ्लॅश, पट असे पत्त्यांच्या जुगारातील खेळ या अड्ड्यावर खेळले जात असल्याचे कळते. या जुगार अड्ड्यांवर हजारो रुपयांची उलाढाल होत असल्याची खबर आहे.पत्त्यांच्या जुगारा व्यतिरिक्त मटका आणि ऑनलाईन जुगार वास्को शहरात खेळले जात असून वास्को पोलिस गांधारीच्या भूमिकेत जुगार चालविणाऱ्यांना मोकळे अंगण निर्माण करून दिले आहे.

    दरम्यान, शहरातील ऑनलाईन मटका जुगाराचे अड्डे व्यवसाय नसल्याने बंद केले आहे.ते अड्डे पुन्हा सुरू करण्यास वास्को पोलिसच सक्ती करीत असल्याची माहिती एका ऑडिओतील संभाषणातून स्पष्ट झाले आहे.या अड्डे चालविणाऱ्यांकडून प्रसार माध्यमातील प्रतिनिधींनाही हप्ते दिले जातात असेही ऑडिओतून उघड झाले आहे.ऑनलाईन जुगार अड्डे मालक आणि वास्को येथील एका व्यक्ती यांच्या मध्ये झालेल्या संभाषणाचा ऑडिओ वास्कोत सोशल मिडियातून वायरल झाल्यावर एकच खळबळ माजली असून, आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी पोलिस प्रमुखांना ई-मेल द्वारे तक्रार करुन चौकशीची मागणी केली आहे. 
   वास्को पोलिस निरीक्षक निलेश राणे सद्या आजारी सुट्टीवर आहे.त्यांच्या पश्चात मुरगावचे निरीक्षक परेश नाईक वास्कोचा कारभार सांभाळीत असले तरी ,वास्को पोलिस स्थानकावर सात ते आठ उपनिरीक्षक आहेत तेही वास्कोतील या जुगार अड्ड्याकडे दुर्लक्ष करून बसले आहेत.वास्को भाजी मार्केटमध्ये पोलिसांचची सदैव ये-जा  असतानाही जुगाराचा अड्डा बिनधास्तपणे चालू असल्याबद्दल आश्र्चर्य व्यक्त केले जाते.

   दरम्यान,वास्को शहरातील पत्याच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करावी अशी सदैव मागणी नगरसेवक क्रितेश गांवकर मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत  करीत आलेले आहे.पण त्यांच्या मागणीकडे पालिकेने सुद्धा सोयीस्कर पणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे , वास्को पोलिसही हाताची घडी घालून गप्प बसले आहेत.परीणामी वास्कोतील सर्व प्रकारचे जुगार अड्डे तेजीत चालले आहे.

   वास्को शहराप्रमाणेच बायणा, मांगोरहिल, नवेवाडे, शांतीनगर परीसरात मोठ्या प्रमाणात पत्त्यांचे जुगार अड्डे सुरू असल्याचे बोलले जात आहे.वास्को पोलिसांनी या गैर व्यवसायाकडे लक्ष देऊन जुगार अड्डे बंद करावेत अशी जनतेची मागणी आहे.

संबंधित बातम्या