दामोदर विद्यालयात रंगली ऑनलाईन ‘हेल्‍दी शेफ’ स्पर्धा

वार्ताहर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

मुलांनी मोठ्यांच्‍या ‍मदतीने बनविले पदार्थ;  छायाचित्रेही केली शेअर

आगोंद: काणकोण - लोलये  येथील श्री दामोदर विद्यालयात राष्ट्रीय पोषण आठवड्याचे औचित्य साधून ऑनलाईन ‘हेल्दी शेफ’ स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेसाठी मुलांनी आपल्या पालकांच्या किंवा भावंडांच्या मदतीने पौष्टिक पदार्थ करून त्याच्या सोबत स्वतःचे फोटो शेअर केले. 

मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, शाळेतील विविध उपक्रमांमध्ये केवळ विद्यार्थी नाही तर पालकांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न असतो. ‘हेल्‍दी शेफ’ स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाल्याने आनंद होत आहे.  शाळेत मुलांना चांगल्या आहाराचे महत्त्‍व शिकविले जाते. तो आहार वेगवेगळ्या भारतीय पद्धतीच्या खाण्याच्या पदार्थातून त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्याही मुलांचा चांगला विकास शक्य आहे यात शंका नाही.

मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पौष्टिक घटक त्यांच्या दैनंदिन आहारात सामावून घेण्यासाठी गृहिणीच्या पाककौशल्याची कसोटी लागते. हीच बाब ओळखून लोलये येथील श्री दामोदर विद्यालयात राष्ट्रीय पोषण आठवड्याचे औचित्य साधून ऑनलाईन ‘हेल्दी शेफ’ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी मुलांनी आपल्या पालकांच्या किंवा भावंडांच्या मदतीने पौष्टिक पदार्थ करून त्याच्या सोबत स्वतःचे फोटो शेअर केले.  शिक्षिका श्रद्धा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास मुलांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांना शिक्षण देताना त्यांची शारीरिक वाढही चांगली व्हावी, प्रतिकार शक्‍ती वाढावी यासाठी त्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्‍व समजावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत मुलांनी अळूवडी, कोकण दुधी पाईस, नाचणीच्या पातोळ्या, खरवस, नाचणीची बर्फी, दलिया मुगडाळीची खिचडी, भोपळा पुरी, मुगाचे लाडू, पारंपारिक तेंडलीची भाजी असे विविध पौष्टिक पदार्थ सादर केले.  

या स्तुत्य उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर तसेच दामोदर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विश्वजित वारीक यांनी सर्व विद्यार्थी, पालक तसेच कार्यक्रमाचे समन्वयक शिक्षिका श्रद्धा देसाई यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या