घरबसल्‍या एका क्लिकद्वारे ऑनलाईन पद्धतीने करा गणेश सजावटीची खरेदी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

यंदाच्‍या चतुर्थीच्या खरेदीला टेक्नोसॅव्ही टच दिसत आहे. कोविड महामारीला बाजारपेठेत जाण्याऐवजी घरच्या घरी बसून केवळ एका क्लिकवर खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही खरेदी सुरक्षित असल्याने उत्साहात लोक चतुर्थीची खरेदी करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करीत आहेत.

पणजी: यंदाची गणेशचतुर्थी दरवर्षीपेक्षा अनेक कारणांनी वेगळी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीसारखे गावी येणे आता शक्य नाही. अनेकजण चतुर्थीसाठी गावी आवर्जुन दाखल होतात. ज्‍यांना जाणे शक्य नाही, ते आहे तिथून बाप्पाची आराधना करीत आहेत. यंदाच्‍या चतुर्थीच्या खरेदीला टेक्नोसॅव्ही टच दिसत आहे. कोविड महामारीला बाजारपेठेत जाण्याऐवजी घरच्या घरी बसून केवळ एका क्लिकवर खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही खरेदी सुरक्षित असल्याने उत्साहात लोक चतुर्थीची खरेदी करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करीत आहेत. 

फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि इतर वेगवेगळ्या शॉपिंग साईटवर चतुर्थीनिमित्त ऑफर्सही सुरू झाल्‍या आहेत. अनेकांच्या घरी चतुर्थीदिवशी नवे कपडे परिधान केले जातात. यावर्षी खरेदी ऑनलाईन केली जाताना पहायला मिळते. शिवाय संकेतस्‍थळाद्वारे ऑर्डर केल्‍यावर ग्राहकाला आठ दिवसांच्या आत ते परत करण्याची मुभा देत असल्याने लोकांना पैसे बुडण्याची भीती वाटत नाही.

एवढेच नव्हे तर गणेशचतुर्थीला लागणारे गोड पदार्थ आणि बाप्पाचा प्रसादही बेकरीत जाऊन खरेदी करण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केली जात आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिआवर महिलांचे समूह कार्यरत आहेत. अनेकजणी घरच्या घरी गोड पदार्थ करून विकताना दिसून येत आहेत. या पदार्थांचे अत्यंत चांगले मार्केटिंग समाज माध्यमावर केले जाताना पहायला मिळत आहे. अनेकजण हे पदार्थ कुरिअर करून पाठविण्याचाही व्यवसाय करीत असल्याचे दिसत आहे. 

विक्रेत्यांना फटका
ऑनलाईन परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेवर आणि येथील विक्रेत्यांच्या मिळकतीवर होताना दिसत आहे. लोकांना बाहेर पडण्याची भीती कोविडमुळे सतावत असल्‍याने लोक कमी प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही दरवर्षीप्रमाणे खरेदीची झुंबड उडताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून लागू केलेल्‍या टाळेबंदीमुळे आधीच बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. गणेशचतुर्थीत थोडाफार व्यवसाय चालेल असे विक्रेत्यांना वाटत होते. मात्र व्यवसाय कमी प्रमाणात होत असल्याचे काही दुकानमालकांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या