कदंबच्या ताफ्यात दाखल झालेल्या तीस पैकी अवघ्‍या दहा इलेक्ट्रिक बसगाड्या सेवेत

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत प्रदूषणमुक्त अशा विजेवर चालणाऱ्या ३० इलेक्ट्रिक बसगाड्या कदंबच्या ताफ्यात दाखल केल्या होत्या व लवकरच त्या राज्यातील विविध भागांत धावणारअसल्याचे जाहीर केले होते.

पणजी  : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत प्रदूषणमुक्त अशा विजेवर चालणाऱ्या 30 इलेक्ट्रिक बसगाड्या कदंबच्या ताफ्यात दाखल केल्या होत्या व लवकरच त्या राज्यातील विविध भागांत धावणारअसल्याचे जाहीर केले होते. मात्र, 20  दिवसांचा कालावधी संपला, तरी अद्याप 30 बसगाड्या रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. फक्त दहा बसगाड्या सध्या दक्षिण गोव्यात सेवेत आहेत. (Only 10 out of 30 electric buses are in service) 

बार्देश तालुक्यात कोरोनाचा विस्फोट; तर डीचोली आणि काणकोणात परिस्थिती चिंताजनक

या बसगाड्यांसाठी चार्जिंग केंद्रांची गरज असते आणि ती केंद्रे स्थापन करण्यास तथा वीज जोडणी घेण्यास बराच वेळ जात असल्याने हवी तेवढी चार्जिंग केंद्रे अद्याप स्थापन झालेली नाहीत. याबाबत कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मडगाव बसस्थानकावर स्थापन केलेल्या चार्जिंग केंद्रात जेवढ्या बसगाड्या चार्ज करता येतात, तेवढ्या 10  बसगाड्या सध्या मार्गावर सेवा देत आहेत. 

चार्जिंगसाठी 33 केव्‍ही जोडणी
चार्जिंग केंद्रासाठी 33  केव्हीची वीजजोडणी हवी असते. वीज खात्याकडून सर्व सोपस्कार पूर्ण करून त्या दिल्या जात असल्याने वेळ लागत आहे आणि त्यामुळेच जादा चार्जिंग केंद्रे स्थापन करणे शक्य झालेले नाही. मात्र, येत्या दहा दिवसांत ही केंद्रे कार्यान्‍वित होतील, असा दावा घाटे यांनी केला. सध्या गोव्याला 30 बसगाड्या मिळालेल्या असून आणखी 20  गाड्या ऑक्टोंबरपर्यंत मिळणार असल्याची माहितीही संजय घाटे यांनी दिली. या बसगाड्या कदंबच्या ताफ्यात दाखल झालेल्या असल्या तरी सदर कंपनी व कदंब महामंडळ यांच्यात करार झालेला आहे. पहिल्या 50  बसगाड्या राज्यात कशा चालतात व किती लाभदायक ठरतात, याचा अभ्यास करूनच पुढील जादा बसगाड्यांबाबत विचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

संबंधित बातम्या