गोवेकरांसाठी पणजी मार्केटचा एकच दरवाजा खुला

गोवेकरांसाठी पणजी मार्केटचा एकच दरवाजा खुला
panji market.jpg

पणजी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य अधिकाऱ्यांनी पणजी बाजार संकुलात लोकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी आणि आसपासचे चार परिसर सूक्ष्म कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारने पणजीतील महानगरपालिकेचे बाजार  संकुलातही नागरिकांच्या येण्या-जण्यावर निर्बंध घातले आहेत. भटलेम, सेंट इनेझ, कारंझलेम आणि व्होडलेम भट  या परिसरातील काही इमारती कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. (The only door of Panaji Market is open for Govekars) 

पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पणजीतील बाजार संकुलात गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्या ठिकाणी पोलिस आणि सीसीपी यांना तैनात करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, बाजाराचा एक दरवाजा वगळता इतर सर्व दरवाजे बंद केले जातील,असेही सांगण्यात आले आहे. मात्र बाजार संकुलाचे दरवाजे बंद केल्यास बरेच लोक  प्रवेशद्वाराजवळ गर्दी करतात, असे  बाजार समितीने निदर्शनास आणून दिले आहे. मात्र यावेळी बाजार संकुलात लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली जाणार नाही. पण बाजारात तैनात करण्यात आलेले निरीक्षक गर्दीचा अंदाज घेतील आणि गर्दी न होण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवतील.  त्याचबरोबर, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सीसीपी कर्मचारीही 50% काम करतील, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढतच आहे. तसेच मंगळवारी कोरोनामुळे 31  जणांचा मृत्‍यू झाला, तर 2110 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण सापडले. सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडले. गेल्या तीन दिवसांत 6824 कोरोना बाधित सापडले, तर तब्‍बल 93  जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. विरोधकांनी सरकारवर असंवेदनशील झाल्याचा आरोप केला आहे.  

त्याचबरोबर, राज्यात पाचशेपेक्षा जास्त कंटेन्टमेंट झोनची नोंद करण्यात आली आहे. या कंटेन्टमेंट झोनमध्ये  मडगाव १७६४, कांदोळी १३९२, पर्वरी ११८२, कुठ्ठाळी ९९३, फोंडा ९५८, पणजी ९५६, म्हापसा ८४७, वास्को ७८१, चिंबल ५८९, डिचोली ५८५, कासावली ५७७, शिवोली ५१५, साखळी ५११. असे तर, इतर अनेक ठिकाणी तीनशे ते चारशे कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना नियमावलीचे कठोरपणे पालन महत्त्वाचे आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com