गोव्यातील ‘ईएसआय’मध्ये एकच, तर जिल्हा इस्पितळात ५७ रुग्ण

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

ईएसआय कोविड इस्पितळात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहचले आहे. या इस्पितळात सध्या एकच रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून,

सासष्टी: कोविड रुग्ण घरी विलगीकरणात राहण्यास पसंती देत असल्याने मडगावातील कोविड इस्पितळातील रुग्णांची संख्या कमी झाली असून दोन महिन्यापूर्वी दीडशेपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या इएसआय कोविड इस्पितळात सध्या केवळ एकाच रुग्णावर, तर नवीन जिल्हा इस्पितळात ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

ईएसआय कोविड इस्पितळात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहचले आहे. या इस्पितळात सध्या एकच रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, कोविड इस्पितळात आतापर्यंत २३९० रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, अशी माहिती ईएसआय इस्पितळ प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांनी दिली. ‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी सासष्टी तालुक्यातील ईएसआय कोविड इस्पितळात २१० खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. कोविड चाचणी करण्यासाठी चार मशीन सुरू करण्यात आले होते. कोविड इस्पितळात सुरवातीला दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दरदिवशी १५ ते ४० होती. पण, आज ही संख्या १ ते २वर येऊन पोहचली आहे. सध्या कोविड इस्पितळात  एकाच रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपाचर सुरू आहेत, असे डॉ फळदेसाई यांनी सांगितले.

कोविड इस्पितळात आतापर्यत २६०५ रुग्ण दाखल झाल्याची नोंद असून, त्यातील २३९० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. या इस्पितळात कोरोनामुळे २११ रुग्णांचे निधन झाले आहे. इस्पितळात ७०० च्या वर प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली असून ३४७ रुग्णांना डायलिसीस करण्यात आले आहेत. गोव्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे, असे  फळदेसाई यांनी सांगितले.

मडगावच्या नवीन जिल्हा इस्पितळातील कोविड इस्पितळात सध्या ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मध्यम स्वरुपाची कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर या इस्पितळात उपचार करण्यात येतात. दरदिवशी १०-१२ रुग्ण या इस्पितळात नव्याने दाखल होतात. तर रोज ७ ते ८ रुग्ण बरे होऊन घरी जातात, अशी माहिती जिल्हा इस्पितळाच्या प्रमुख डॉ. दिपा कुरैया यांनी दिली.

संबंधित बातम्या