पंचायतीत पाच वर्षे एकच सरपंच असावा- मायकल लोबो

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

राज्यातील सर्वात धनवान पंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या कळंगुट पंचायतीच्या सरपंचपदी दिनेश सिमेपुरुषकर यांची एकमताने सोमवारी सकाळी सहकारी पंचायत मंडळाकडून निवड करण्यात आली. यावेळी मंत्री लोबो बोलत होते.

शिवोली- प्रत्येक पंचायतीत एकमेव सरपंच पाच वर्षांच्या कालावधीसाठी असावा जेणेकरून हाती घेण्यात आलेल्या विकासकामांची विनाखंड पूर्तता करणे सोपे होते, परंतु निवडून दिलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंचायत मंडळाकडून घेण्यात आलेल्या अलिखीत करारात आपण हस्तक्षेप करू शकत नाही, असे मत कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी कळंगुट येथे व्यक्त केले.  

राज्यातील सर्वात धनवान पंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या कळंगुट पंचायतीच्या सरपंचपदी दिनेश सिमेपुरुषकर यांची एकमताने सोमवारी सकाळी सहकारी पंचायत मंडळाकडून निवड करण्यात आली. यावेळी मंत्री लोबो बोलत होते. यावेळी निर्वाचन अधिकारी या नात्याने फट्टुसिंग शेटगावकर यांनी काम पाहिले. कळंगुट पंचायतीचे याआधीचे सरपंच अँथनी मिनेझीस तसेच शॉन मार्टीन्स यांनी स्थानिक आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्या पुढाकाराने पंचक्रोशीत सुरू केलेल्या विकासकामांची पूर्तता करण्याचे आश्वासन नवनियुक्त सरपंच सिमेपुरुषकर यांनी यावेळी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. 

कळंगुटमध्ये मंत्री लोबो यांच्या पुढाकाराने विकासकामे अपेक्षेपेक्षा गतीने होत आहेत. त्यांनीच माझ्यावर दाखविलेल्या विश्वासानुसार मला सरपंचपद प्राप्त झाले आहे. त्यांच्या तसेच पंचायत मंडळातील सहकाऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सरपंच दिनेश सिमेपुरुषकर यांनी यावेळी सांगितले. 

कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारकडून घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे सर्वांनीच पालन करण्याचे आवाहन यावेळी नवनियुक्त सरपंच दिनेश सिमेपुरुषकर यांनी केले. कळंगुटातील सांडपाणी निचरा व्यवस्था तसेच नवीन पोलिस इमारतीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत मंडळातील समर्थक गटाचे सर्वच्या सर्व पंच सदस्य कार्यालयात उपस्थित होते

संबंधित बातम्या