दिशाभूल करण्यात या दोन्ही पक्षांचा हात, भाजप आणि आप एकाच नाण्याच्या दोन बाजू: डिमेलो

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांचे गोव्यात येणे आणि यापुढील निवडणूक ही भाजप विरोधात आप पक्षाचीच होईल असे म्हणणे हे सारे ठरवून होत आहे. भाजप आणि आप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

पणजी: आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांचे गोव्यात येणे आणि यापुढील निवडणूक ही भाजप विरोधात आप पक्षाचीच होईल असे म्हणणे हे सारे ठरवून होत आहे. भाजप आणि आप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे गेल्या आठवडाभरात जे काही झाले आणि जे काही होणार आहे ते सारे ठरवून होत आहे. जनतेने त्याकडे केवळ करमणूक म्हणून पहावे असे कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी आज येथे पत्रकार परिषदेत नमूद केले.

ते म्हणाले, दिशाभूल करण्यात या दोन्ही पक्षांचा हात कोणी धरू शकणार नाही. दिल्लीत कोरोनाने सर्वांना सळो की पळो करून सोडले आहे. अशी परिस्थितीत फुकटची वीज काय कामाची आहे. त्याशिवाय दिल्लीची ओळख सर्वाधिक प्रदुषित शहर अशी आहे. त्याचेही श्रेय आप पक्ष घेणार आहे का. राष्ट्रीय पातळीवर बेरोजगाराचे प्रमाण २५ टक्के असताना दिल्लीत मात्र बेरोजगारी ४४ टक्के आहे याचे काय उत्तर आप कडे आहे हे त्यांनी सांगावे. केवळ दिशाभूल करून भाजपविरोधी मतांत फूट पाडायची आणि भाजपला विजयी होण्यास मदत करायची हेच या पक्षाचे एकमेव धोरण आहे.

आपने २०१७ मध्ये आम्हीच सरकार स्थापन करू असे म्हणत जनतेची दिशाभूल केली. बाणावली वगळता इतर सर्व ठिकाणी या पक्षाच्या उमेदवारांनी अनामत रकमाही गमावल्या असे नमूद करून ते म्हणाले, भाजपविरोधी मते कॉंग्रेसकडे वळता कामा नयेत यासाठी हा पक्ष कार्यरत आहे. त्या पक्षाच्या आमदार आतिषी या तत्‍कालीन स्थानिक संयोजक एल्विस गोम्स यांना न घेता फातोर्डा येथे भाजपविरोधी मतांची फाटाफूट कशी करायची याचे धोरण निश्चित करण्यासाठी बैठक घेण्यासाठी गेल्या होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या