ओपा जलप्रकल्पात पुरेसा पाणी साठा

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

टॅंकरद्वारे वेलिंग, प्रियोळ, धारबांदोडा, बेतोडा, फोंडा, उसगाव आदी तीव्र पाणी टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा होत आहे.

फोंडा

खांडेपार येथील ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पात सध्या तरी पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून पावसाळ्यापूर्वी पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी माहिती या प्रकल्पाच्या काही अधिकाऱ्यांनी दिली. फोंडा पाणी पुरवठा खात्याने ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पंचवीस पाण्याच्या टंकरची सोय उपलब्ध केली आहे. त्याप्रमाणे पाणी टंचाईग्रस्त भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
टॅंकरद्वारे वेलिंग, प्रियोळ, धारबांदोडा, बेतोडा, फोंडा, उसगाव आदी तीव्र पाणी टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा होत आहे. मान्सुनपूर्व कामाचा एक भाग म्हणून ओपा जल शुध्दीकरण प्रकल्पातील वीज दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेण्यात आल्याने किमान दोन दिवस फोंडासह तिसवाडी तालुक्‍यात पाणीपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता. आता हा पाणीपुरवठा पूर्वपदावर करण्यात आला आहे. खांडेपार ओपा येथे नवीनच होऊ घातलेल्या २७ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पातून पणजी व अन्य भागाला दोन जलवाहिन्यातून व्यवस्थितपणे पाणी पुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीच चणचण भासणार नसून पाण्याचे व्यवस्थितरित्या नियोजन होत आहे.
ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पातून रोज १६० ते १७० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. ओकांब धारबांदोडा येथील खांडेपार नदीच्या पात्रत उभारण्यात आलेला बंधारा तुडुंब पाण्याने भरला असून त्यामुळे लोकांना पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या ओपा जलशुध्दीकरण प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी गांजे पाणी प्रकल्पाच्या भूमीगत जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यामुळे जलसाठा अधिक होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

संबंधित बातम्या