कामाची वेळ बारा तास करण्यास विरोध

dainik gomantak
रविवार, 24 मे 2020

टाळेबंदीचे कारण पुढे करून गोव्यासह पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आदी राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले आहेत.

डिचोली,

‘टाळेबंदी’चे कारण पुढे करून देशातील विविध राज्यांनी अवलंबिलेल्या कामगार विरोधी धोरणाला भारतीय मजदूर संघाने तीव्र हरकत घेतली आहे. कामाची वेळ वाढवताना आठ तासावरून बारा तास करण्याचा निर्णय हा कामगारांवर अन्यायकारक आहे, असे मजदूर संघाने स्पष्ट करताना कामगार विरोधी धोरण मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. तशी मागणी करणारे निवेदन भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांना पाठविले असून संघाचे गोवा प्रदेश सरचिटणीस कृष्णा पळ यांनी हे निवेदन उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी आर. मेनका यांना सादर केले आहे.
‘कोविड’ महामारीमुळे मागील जवळपास ५० दिवसांपासून देशभर लागू असलेल्या ‘टाळेबंदी’मुळे कामगारवर्ग अडचणीत आला आहे. टाळेबंदीचे कारण पुढे करून गोव्यासह पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आदी राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले आहेत. जवळपास सव्वाशे वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांना मिळालेले अधिकार काढून घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, असे भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे. कामकाजाची वेळ बारा तास करणे म्हणजे कंपनी व्यवस्थापन त्याचा गैरफायदा घेवून कामगारांवर अन्याय करण्याची शक्‍यता वाढली आहे, असे कृष्णा पळ यांनी म्हटले आहे. सर्व कामगारांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन द्यावे, अशी मागणीही भारतीय मजदूर संघाने केली आहे. कामगार विरोधी धोरण मागे घेतले नाही, तर कामगार गप्प बसणार नाहीत, असेही मजदूर संघाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या