विरोधकांची टीका विनाकारण

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

वीजमंत्री नीलेश काब्राल : जनतेपर्यंत पोहोचण्‍यासाठी मुद्देच नसल्‍याने मुद्द्यांची पुनरावृत्ती

पणजी

विरोधक अकारण सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्याकडे जनतेचा भावणारे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे आहे तेच तेच मुद्दे वारंवार ते मांडत आहेत. कधीतरी मुख्य सचिवांना भेट, कधी पत्रकार परिषद, असे प्रकार त्यांनी चालवले आहे. जनतेचे लक्ष वेधण्‍यासाठी त्यांचे हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समक्ष पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गोव्यात येणाऱ्यांच्या बाबतीतले नियम का बदलले, याची माहिती विरोधक करून घेत नाहीत. एका दिवसांत चार हजार जण येणार होते. गोमेकॉत एक हजार जणांचीच चाचणी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्या दिवसापुरता नियम बदलला होता. मात्र, त्याचा बाऊ करून मुख्यसचिवांची भेट काही आमदारांनी घेतली. सरकारला जनतेची काळजी नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सरकारला जनतेची काळजी आहे. कोविडची लागण समाजात होऊ नये म्हणून जे काही उपाय योजायला हवेत, त्याची अंमलबजावणी सरकार करीत आहे. त्याचमुळे आजवर केवळ प्रवाशांनाच लागण झालेली आहे. गोमंतकीय समाजात कोविडचा प्रसार झालेला नाही.

विरोधक सवंग लोकप्रियतेच्‍या मागे...
टीका करणे सोपे आहे. टाळेबंदीनंतर आजवर २४ तास राज्याचे प्रशासन काम करीत आहे. सरकारला धमकावण्याचा प्रयत्न करू नये, आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत, असे नमूद करून काब्राल म्हणाले, टीका करणाऱ्यांनी सरकारने काय काय केले, हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. जनतेला सरकारने काय केले याची जाणीव आहे. विरोधकांना नैराश्याने घेरले आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधक सवंग लोकप्रियतेच्या मागे लागले आहेत. विरोधकांना काही म्हणायचे असेल, तर त्यांनी सरकारकडे ते म्हणणे मांडावे. कुठेतरी काही वक्तव्य केले म्हणून सरकारने त्याची दखल घ्यावी, असे नाही. त्यांनी योग्य पद्धतीने सरकारशी संवाद साधावा.

दुटप्‍पी भूमिका अयोग्‍य
मुख्यमंत्री म्हणाले, दहावीची परीक्षा घ्यावी म्हणून हेच लोक (विरोधक) सरकारवर मोठा दबाव आणत होते. त्यानंतर परीक्षा घेण्याच्या तारखा जाहीर केल्या, तेव्हा हेच लोक (विरोधक) परीक्षा घेऊ नका, म्हणून बोलू लागले. काहींना त्यांनी न्यायालयातही जायला लावले. दर्यावर्दींना आणावे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करायला लावले. दर्यावर्दींना सरकारने आणले आणि संस्थात्मक अलगीकरणात ठेवले. त्यांना गावात आणू नका, असे म्हणण्यासाठी यांनीच काहीजणांनी पुढे काढले. दुतोंडी वक्तव्य करणारे असे हे सगळेजण आहेत. गोमंतकीय समाज त्यांना ओळखून आहे. आता कोविडचा प्रसार होत नाही, असे दिसल्याने सारेजण घराबाहेर पडले आहेत. आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.

संबंधित बातम्या