"भाजप सरकारने गोव्याला दिवाळखोर केले" विरोधी पक्षनेते दिगंबर कामत

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सामान्य लोकांसाठी शंभर कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून कोविड महामारी व कोसळलेल्या अर्थव्यवस्थेने संकटात सापडलेल्यांना मुक्ती द्यावी.

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सामान्य लोकांसाठी शंभर कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून कोविड महामारी व कोसळलेल्या अर्थव्यवस्थेने संकटात सापडलेल्यांना मुक्ती द्यावी. भाजप सरकारने आज राज्याला दिवाळखोर केले असून लोकांना आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

भाजप  सरकार प्रत्येक आठवड्याला १०० कोटी रुपयांचे कर्ज काढत असून, सरकारची वृत्ती " कर्ज काढून सण साजरे करणे" ह्या म्हणी प्रमाणे असल्याचे नमूद करून त्यानी नमूद केले आहे, की लोक हाल अपेष्टा सहन करीत असताना, भाजप सरकार उत्सवी वातावरणाच्या भ्रमात वावरत आहे. देशात कोविड टाळेबंदी असताना भाजप सरकार व्हर्चुअल रॅली करण्यात व्यस्त होते. सामान्य माणुस संकटात असताना "टाळी बजाव-दिया जलाव" इव्हेंट करून भाजपने असंवेदनशीलतेचे प्रदर्शन केले. आजच्या संकट काळात अनाठायी खर्च न करता, गरीब व सामान्य लोकांसाठी मदतीचा हात देणे हिच गोवा मुक्तीसाठी आपले प्राण व योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र सैनीकांसाठी खरी मानवंदना ठरेल.

भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असुन, त्यामुळे आज प्रत्येक जण आर्थिक संकटात आहे. सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना चालू ठेवण्यास निधी उपलब्द नाही. दयानंद सामाजीक सुरक्षा योजना, विधवा-दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरीक, गृह आधार, खलाशी याना मासिक लाभ सहा-सहा महिने सरकार देत नाही. गोव्यातील सिने निर्मात्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सरकारने सहा वर्षे बंद ठेवली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी हवालदील आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्र्यानी त्वरित राज्याची अर्थ व्यवस्था, कोविड हाताळणी, म्हादई, पर्यावरणाचा नाश करणारे तिन प्रकल्प, कोळसा हाताळणी यावर श्वेतपत्रीका जारी करावी अशी मी परत एकदा मागणी करतो. लोकांना तथ्यांवर आधारीत आकडेवारीसह माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा:

स्पाईस जेटचे सी प्लेन चे पर्यटनाच्या नकाशावर गोव्याला स्थान देण्यासाठी प्रयत्न

संबंधित बातम्या