मडगाव: बेरोजगारांची दिशाभूल नको; भाजप सरकारने लोकांना मुर्ख बनवणे थांबवा

मडगाव: बेरोजगारांची दिशाभूल नको; भाजप सरकारने लोकांना मुर्ख बनवणे थांबवा
Opposition leader Digambar Kamat said should not mislead the unemployed

मडगाव: सेंटर फॉर मॉनिटरींग अनएप्लॉयमेंट (सीएमआयई) यांनी जारी केलेल्या अहवालात बेरोजगारीत गोव्याला दुसरे स्थान मिळाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकांना मुर्ख बनविण्याचे थांबवून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

दिशाहीन भाजप सरकारने 2012 मध्ये सत्तेत आल्यापासून राज्याला आर्थिक दिवाळखोरीत काढून राज्याची अर्थव्यवस्थाच खिळखिळी केली आहे, असे कामत म्हणाले. सीएमआयई संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीने गोव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या भाजप सरकारचा दावा खोटा ठरला आहे. गोव्यात नवीन रोजगार उपलब्ध करून देण्याच्या घोषणा करणाऱ्यांसाठी हे एक थप्पड असल्याचे कामत म्हणाले. 

2012 मध्ये सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने राज्यातील रोजगार संधी नष्ट केल्या. खाण व्यवसाय बंद करणे, पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी ठोस कृती न करणे, गोवा व्हिजन 2035 अहवाल कपाटात बंद करून ठेवणे, असे राज्याच्या हिताविरूद्धचे निर्णय या भाजप सरकारने घेतले व रोजगाराच्या संधीच बंद केल्या, असा दावा  कामत यांनी केला. 

2012 ते आजपर्यंत भाजप सरकारने काय केले? हे माजी लोकायुक्तांनी 21 भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याच्या दिलेल्या आदेशावरून गोमंतकीयांना कळले आहे. या शिवाय या सरकारकडे दाखविण्यासारखे काहीच नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यानी अर्थसंकल्पातून ‘गोंयचे दायज’ ही कॉंग्रेस सरकारने तयार केलेली योजना कार्यांन्वित करण्याचे जाहीर केले. आता मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सरकारच्याच काळात तयार झालेला ‘गोवा व्हिजन-2035’ अहवाल स्‍वीकारुन तो अंमलात आणावा. राज्याची घडी नीट बसवून रोजगार संधी उपलब्ध होण्यास त्यामुळे मदत होईल, असे कामत यांनी सांगितले.

 मुख्यमंत्र्यांनी आतातरी राज्यातील छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही मागितलेली 100 कोटींचे पॅकेज जाहीर करावे. सरकार कृती करण्यास मागे पडले तर बेरोजगारीत गोवा लगेच पहिला क्रमांक घेईल. असा इशारा कामत यांनी दिला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com