‘आलमट्टी’ची उंची वाढविण्यास विरोध

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर वाढवली तर महापुराचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला बसेल. यासाठी केंद्र सरकारबरोबर सकारात्मक चर्चा करू.

कोल्हापूर: कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर वाढवली तर महापुराचा फटका कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला बसेल. यासाठी केंद्र सरकारबरोबर सकारात्मक चर्चा करू. त्यातून तोडगा काढून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू; पण महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकाद्वारे मांडली आहे.

त्यात म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाचे आदेश, तांत्रिक बाबी, आजवरची पुराची आकडेवारी तपासूनच याबद्दलचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, वित्त आणि जीवित मालमत्ता यांची हानी होणार नाही, याची काळजी घेणे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवून जर पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार असेल, तर केंद्रीय नेत्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल आणि वेळप्रसंगी जनतेच्या हितासाठी रस्त्यावरचे आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही. 

त्यांनी म्हटले आहे, की अलमट्टी धरणाबद्दलच्या काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत. हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांशी संबंधित विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान किंवा केंद्र सरकार घाईगडबडीने किंवा एकांगी निर्णय घेणार नाही. तथापि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली, तर त्यांनाही पश्‍चिम महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना देऊ. 

केंद्रीय स्तरावर या धरणाची उंची वाढल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देऊ आणि व्यापक हिताचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असेही ते म्‍हणाले.

संबंधित बातम्या