गोवा नगरपालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधक एकवटले

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

गोवा नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे संकेत दिसून येत आहेत.

सासष्टी  : पालिका निवडणुकीत भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे संकेत दिसून येत आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलिप यांनी एकत्र येऊन चर्चा केली. जनतेच्या भावनांचा आदर करून सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येण्याची गरज असून, या निवडणुकीत भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी गोवा फॉरवर्ड, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्र येऊन निवडणूक लढवावी असे वाटत आहे. मडगाव पालिका निवडणुकीसाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे मत केले असून, त्यानुसार चर्चा करण्यात येत आहे. गोव्यातील कुठल्याही प्रभागात भाजप पक्षाच्या विरोधात सक्रिय असलेल्या उमेदवाराला पाठींबा देण्यात येणार आहे, अशी माहिती फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेत घोळ झाल्याने काहीजण न्यायालयात गेले आहेत. सोमवारी यावर निवाडा देण्यात येणार असून, निवाड्यानंतरच उमेदवारीवर चर्चा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आयआयटी’ जागा निश्‍चितीसाठी गोवा सरकारची आता सावध भूमिका

पालिका निवडणूक ही पक्ष पातळीवर लढविण्यात येणार नसल्यामुळे सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे मत आहे. या पालिका निवडणुकीत भाजप पक्षाला पराभूत करणे हा मुख्य उद्देश आहे. पालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन पॅनल तयार करणे गरजेचे असून, यावर न्यायालयाने निवाडा दिल्यावर चर्चा करण्यात येणार आहे, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. पालिका निवडणुकीत भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम करणे महत्वाचे बनले असून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनाही सर्वांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी योग्यरीत्या नियोजन करण्यासाठी चर्चा करण्यात येत आहे. सोमवारी निवाडा झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलिप यांनी सांगितले. तर, पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा असलेल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बिहारच्या पाटण्यात उभं राहतंय नवं ‘गोवा’ शहर!

‘ते’ पूर्वीपासूनच एकत्र..

 पालिका निवडणुकीसाठी एकत्र येत असल्याचा दावा कॉंग्रेस, गोवा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला असला तरी ते पूर्वीपासूनच एकत्र असून जनतेची केवळ दिशाभूल करण्यासाठी एकत्र येण्याचे ढोल बडवण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार दामू नाईक यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड यापूर्वीही एकत्र होती. आताही एकत्र येऊन मडगावचा विनाश घडवण्याचा त्यांचा हेतू आहे. जनतेने त्यांना बळी न पडता भाजप प्रणीत ‘व्हायब्रंट मडगाव’ पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन भाजपचे नेते दामू नाईक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या