केरी - सत्तरीत सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्‍वी

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

प्रशांत राणे यांचे कष्‍ट शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी : भेंडी, वाल, चवळी, दोडगी, काकडी, वांगी, घेवडा, केळींची लागवड

दशरथ मोरजकर
पर्ये

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि त्याचा वाढता खर्च पाहता सामान्यांचे शेतीकडील दुर्लक्ष होत आहे, तर दुसऱ्या बाजूने सेंद्रिय शेती हीसुद्धा खर्चिक बनत चालली आहे. अशा पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती ही कमी खर्चिक असल्याने त्याचा प्रसार व्हावा या हेतूने झटणारे केरी सत्तरीतील प्रगत शेतकरी प्रशांत विश्वासराव राणे यांनी नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग सिद्ध केला आहे. त्‍यांचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

भेंडी लागवड यशस्वी
गेल्या बऱ्याच वर्षांपासून रासायनिक शेती करणारे श्री. राणे यांना विविध चळवळीतून रासायनिक शेती हे विष पिकवणारी शेती आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नैसर्गिक शेतीत प्रवेश केला आणि यंदा किफायतशीर भेंडीची लागवड केली. त्यातून त्यांना चांगले उत्‍पादनही मिळत आहे.
श्री. राणे यांनी २ एकर (८ हजार चौरस मीटर) जमीन क्षेत्रफळात पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने भेंडी लागवड केली. लागवड केल्‍यानंतर ४५ दिवसांनी त्यांना उत्‍पादन मिळायला सुरवात झाली. आता त्‍या लागवडीतून दरदिवशी सुमारे १५० किलो भेंडी मिळत आहे. या भेंडीची विक्री गोवा राज्य कृषी पणन महामंडळात व खुल्या बाजारातही होते. त्यामुळे त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. ही लागवड करायला त्यांना एकूण खर्च सुमारे एक लाख १० हजार रुपये खर्च आला. पण, आता तिप्पट उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरवातीला जमिनीची मशागत करताना मातीमध्ये घनामृत मिसळून लागवड केली आणि त्यानंतर त्यावर महिन्यांतून ४ वेळा जीवामृत देत राहिले. याव्यतिरिक्त आणखी कोणतेही सेंद्रिय अथवा इतर खत वापरण्‍यात आले नाही.

काय आहे नैसर्गिक शेती
रासायनिक शेती म्‍हणजे कीटकनाशके, जंतूनाशके आदींचा वापर करून केलेली शेती. सेंद्रिय शेती म्हणजे कंपोस्ट खत, गांडूळ खतांचा वापर करून केलेली शेती, तर नैसर्गिक म्हणजे कुठलेही रासायनिक अथवा सेंद्रिय खत न वापरता जीवामृत व घनजीवामृत यांचा वापर करून शेतीतच उगवणाऱ्या तणाचे नैसर्गिक खतात रूपांतर करून केलेली शेती आहे. या घनजीवामृत व जीवामृतामुळे जमिनीचा पोत सुधारला जातो आणि उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळते. या शेतीत रोपाला किंवा पिकाला कीड लागू नये म्हणून दशपर्णी अर्क आदींचा वापर केला जातो.

पद्मश्री सुरेश पाळेकर यांच्याकडून प्रेरणा
नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते पद्मश्री सुरेश पाळेकर यांच्या प्रेरणेने आपण या नैसर्गिक शेतीत प्रवेश केला. आपण पूर्वी रासायनिक शेती करायचो. रासायनिक शेती ही विष निर्माण करणारी शेती आहे, हे आपल्या लक्षात आल्यावर आपण यावरील पर्यायाच्या शोधात होतो. तेव्हाच आपल्याला सुरेश पाळेकर यांच्या नैसर्गिक शेतीची माहिती यू- ट्यूब वर मिळावी. त्यानंतर आपण याची जास्तीत जास्त माहिती मिळवून नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची महाराष्ट्रात जाऊन भेट घेतली आणि हा प्रयोग सुरू केला. या प्रयोगातून आपल्याला आता यश मिळाले. नैसर्गिक शेतीतून आम्ही स्वतःसाठी आणि दुसऱ्याला विकणाऱ्या भाज्या विषमुक्त आहेत, याचे आम्हाला समाधान मिळत असल्याने प्रशांत राणे यांनी सांगितले.

जीवामृत, घनजीवामृतासाठी
देशी गायीचे गोमूत्र व शेणखत

नैसर्गिक शेतीसाठी जीवामृत आणि घनजीवामृत हे दोन महत्त्‍वाचे घटक आहेत. सुरवातीला जमीन तयार करताना घनजीवामृताचे मिश्रण मातीत मिसळायचे असते. घनजीवामृत बनवताना २०० किलो शेणखत (गोबर), त्यात २० किलो जीवामृत मिसळून ३ दिवसानंतर वापरावे. त्यानंतर त्या पिकाला महिन्यातून २ ते ४ वेळा जीवामृत घालावे लागते. १ एकर जमिनीत जिवामृत बनवण्यासाठी १० किलो ताजे शेणखत (गोबर), १० लिटर गोमूत्र, १.५ किलो गूळ, १.५ किलो बेसन पीठ यांचे मिश्रण २ ते १२ दिवसांच्या कालावधीत रोपाला द्यावे. मिश्रण केलेले जीवामृत रोज सकाळ - संध्याकाळ गुळवावे. हे दिल्याने जमिनीचा पोत वाढत जातो. हे जीवामृत व घनजीवामृत बनवण्यासाठी देशी अथवा गावठी गाय- बैल यांचे गोबर- गोमूत्र वापरावे असेही त्यांनी सांगितले.

मिश्र शेतीचा प्रयोग
प्रशांत राणे यांनी भेंडी शेती बरोबरच आणखी दोन एकर जागेवर मिश्र शेतीचा प्रयोग केला आहे. ही मिश्र शेती करताना अल्पजीवी लागवड व मध्यम जीवीची शेती केली आहे. या अल्पजीवीत वाल, चवळी, दोडगी, काकडी, वांगी, घेवडा यांची लागवड केली आहे. तर त्याच्याच मधोमध केळी व शेवगा याची मध्यमजीवी लागवड केलेली आहे. अल्पजीवी लागवड पीक घ्‍यायला सुरवात झाली आहे. ही आंतर पीक असलेली सहजीवन असेही त्याला संबोधले जाते.

कुटुंबाचे सहकार्य
ही शेती करायला आपल्याला कुटुंबाचे सहकार्य लाभत आहे. शेतात मी स्वतः काम करतो व त्याचबरोबर घरातील इतर मंडळीही वावरतात. माझ्या तीन काकांनी शेती करण्यासाठी आपल्याला त्यांची पडिक जमीन दिली आहे. शेतात कामासाठी काही पुरुष व महिला कामगार असल्याने त्यांना यातून रोजगार प्राप्त होत आहे.

 

संबंधित बातम्या