अन्यथा विक्री होईल बंद ः मडकईकर

Dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020

सामाजिक अंतर पाळले जात नसल्याबद्दल व्यक्त केली खंत

पणजी

महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भाजीपाला व फळविक्रेत्यांची सोय केली. त्याचबरोबर मासळी मार्केटही रविवारी सुरू केले. परंतु नागरिक अजूनही सामाजिक अंतराची (सोशल डिस्टन्स) अट पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेऊन नागरिकांनी सामाजिक अंतराची अट पाळावी, अन्यथा अटीचे उल्लंघन होत असल्याचे दिसल्यास त्याचा परिणाम म्हणजे सुरू झालेली विक्रीही बंद करण्याची वेळ येईल, असे आवाहन महापौर उदय मडकईकर यांनी केले आहे.
मडकईकर म्हणाले की, महापालिकेने नागरिकांच्या आणि विक्रेत्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना खुल्या जागेत भाजी व फळे विकण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेचे मार्केट सुरू करण्यासाठी संघटना प्रयत्नशील असली तरी लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता ते शक्य वाटत नाही. मार्केटच्या मुख्य इमारतीच्या बाजूला असलेल्या दुकाने उघडण्यासाठी विक्रेते आग्रही आहेत. परंतु या दुकानांमधील अंतर पाहता लोकांना येता-जाता त्रास होता आणि येथे सामाजिक अंतराची अटही पाळली जाणार नाही. त्यासाठी दुकाने एक आड एक खुली करता येतील काय, हेही तपासले जात आहे.
आज सकाळी काही दुकानदारांनी दुकाने उघडल्याचे लक्षात आले होते, त्यामुळे महापालिकेने निरीक्षक पाठवून ती दुकाने बंद केली. या दुकानांना महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. सायंकाळी मार्केटची मुख्य इमारत आतील बाजूने स्वच्छ करून घेण्यात आली आहे. पणजी महापालिकेच्या काही भागातील दुकानांतील साहित्य दुकानदारांनी परवानगी घेऊन ते बाहेर काढले होते. त्यामुळे दुकानांभोवतीचा परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे. मार्केट इमारतीमध्ये वरील मजल्यावर कपडे, मोबाईल व इतर दुकाने आहेत, त्यांनाही या टाळेबंदीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे, याची आम्हाला जान आहे. मार्केट कशा पद्धतीने उघडता येईल, हे तपासले जात असून लवकरच ते खुले केले जाईल, असे मडकईकर म्हणाले.

संबंधित बातम्या