कृषीक्षेत्रात जोश निर्माण करणारे ‘आमचे शेतकार’

borkar
borkar

गोमंतकीय शेतीकडे पाठ फिरवत असल्याची रडकथा मागे पडून आता गोव्यात कृषी क्रांती घडत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. रेव्हुल्युशनरी गोवा संघटनेने गोव्याला शेतीत सेंद्रीय राज्य बनवणे व कृषी क्षेत्रात तरुणांसाठी रोजगाराची निर्मिती करणे या उद्देशाने ‘आमचे शेतकार’ हा शेतकऱ्यांचा विशाल गट स्थापन करून राज्यव्यापी कृषी चळवळ सुरू केली आहे. गोव्यातील तेराही तालुक्यातील एक हजारपेक्षा जास्त शेतकरी या चळवळीत सहभागी झाले आहेत. यामध्ये तरुण शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय असून त्‍यामुळे कृषी क्षेत्रात जोश निर्माण झाला आहे.

तालुकानिहाय समन्‍वयक सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देऊन गोव्याला सेंद्रीय राज्य बनविण्याच्या तसेच, गोव्यातील बेरोजगार तरुणांना कृषी क्षेत्राच्या माध्यमाने व्यावसाय प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने ‘आमचे शेतकार’ हा गट काम करीत असून या गटाचे तेराही तालुक्यात असलेले समन्यवक विविध भागांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. संपूर्ण गोव्यातील एक हजार पेक्षा जास्त शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले असून गोव्यातच एक्झॉटिक व्हेजिटेबल्स पिकविण्यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे. ग्राहक आरोग्याबाबात जागरुक होऊन सेंद्रीय कृषी मालाची खरेदी करीत असून रासायनिक खतांच्या वापराने माती व पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे महत्त्‍वाचे बनले आहे.

ऑटोमोबाईल इंजिनियर ते पूर्णवेळ शेतकरी

‘आमचे शेतकार’ या संस्थेचे प्रमुख नीतेश बोरकर हे ऑटोमोबाईल इंजिनिअर असून ते स्वतः पूर्णवेळ शेती करण्यावर भर देत आहेत. नीतेश यांनी गेल्या हंगामात चार हजार चौरस मीटर जमिनीत एक्झॉटिक व्हेजिटेबल्स श्रेणीत येणाऱ्या पिवळ्या कलिंगडांचे यशस्वीपणे पीक घेतले होते. यातून त्यांना ३० हजार रुपयांचा नफा झाला होता. ही पिवळी कलिंगडे १०० टक्के सेंद्रिय होती. गोव्यात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे तसेच गोव्यतील तरुणांनी शेती करण्यास पुढे यावे, यासाठी नीतेश बोरकर प्रयत्न करीत आहेत.

शेतमालाच्‍या बाजारपेठेत ‘गोवा फ्रेश’

शेतमालास बाजारपेठ मिळावी यासाठी ‘गोवा फ्रेश’ हा गट तयार केला आहे. या गटाचे सदस्य शेतकऱ्यांनी पिकविलेला सेंद्रीय कृषीमाल खरेदी करून त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. बेरोजगार तरुणांना या कामात सहभागी करून घेण्यात येत आहे. यातून या तरुणांना अर्थप्राप्‍तीही होत आहे. या गटात शेतकरी कृषीमाल विक्री करण्यास इच्छूक नसल्यास त्यांना दुसऱ्या ठिकाणीही आपला कृषीमाल विकण्याची मुभा देण्यात आली आहे, असे बोरकर यांनी सांगितले.

गोव्यातील पंचतारांकित हॉटेलात वापरण्यात येणाऱ्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स बाहेरून आयात केल्या जात आहेत. या भाज्या गोव्यातही पिकविणे शक्य आहे. या भाज्यांना चांगला दरही मिळत असून गटात जोडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी या भाज्या पिकवून त्याची विक्रीही केली आहे. गोव्याला सिक्कीमप्रमाणे सेंद्रीय राज्य बनविण्याच्या तसेच तरुणांना शेती व्यवसायाकडे आकर्षित करण्याच्या इराद्याने रेव्हुल्युशनरी गोवन्सने ‘आमचे शेतकार’ हा गट स्थापन केला.

- नीतेश बोरकर, ‘आमचे शेतकार’ गटाचे प्रमुख.

शेतीसह, कुक्कुटपालन, मधमाशी, पशूपालन संदर्भात मार्गदर्शन

‘आमचे शेतकार’ गटाच्या तेराही तालुक्यात असलेल्या समन्यवकांच्या मदतीने सेंद्रीय साहित्य पुरवून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. सेंद्रीय खताची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात होणाऱ्या आधुनिक बदलासंबंधी शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम हा गट करीत आहे.

हा गट शेतीबरोबर कुक्कुटपालन, मधमाशी पालन, पशुपालन याविषयी मार्गदर्शन करीत आहे. गोव्यातील अनेक शेतकरी अजून पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा कमविणे शक्य होत नाही. अशा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला नफा होऊ लागलेला आहे, असे बोरकर यांनी सांगितले.

लघू उद्योगावरही भर

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कृषीमालावर प्रक्रिया करून विक्री केल्यास त्यातून जास्त पैसा कमविणे शक्य असल्यामुळे भविष्यात ‘आमचे शेतकार’ गटातर्फे लघू उद्योग सुरू करण्यावर भर देण्यात येणार असून या लघू उद्योगाद्वारे रोजगार निर्मिती होण्यास सहाय्यता मिळणार आहे. आमचे शेतकार गटाच्या तरुण शेतकऱ्यांनी गोव्यात न पिकणाऱ्या भाज्यांचे पीकसुद्धा यशस्वीपणे घेतलेले आहे. गोव्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणून गोव्याला सेंद्रीय राज्य बनविण्यासाठी सुरू केलेला हा गट योग्यरीत्या चालविण्यासाठी सर्व तालुक्यातील समन्वयक प्रयत्न करीत आहेत. कृषी पर्यटन हा कृषी आणि पर्यटन या दोन व्यवसायांच्या संयोगातून पुढे आलेला व्यवसाय असून गोव्यात कृषी पर्यटन व्यवसायाचा विस्तार होणेही शक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com