आम्हा भगिनींचा ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्र्न मिटला

dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

‘आता आम्हा भगिनींचा ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्र्न मिटला’, असे उत्स्फूर्त उद्‍गार हातात मोबाईल आल्यानंतर प्रतिका प्रमोद वेळीप हिने काढले. प्रतिका नववीत शिकत असून तिची लहान बहीण सहावीत शिकत आहे. लहानपणीच ही दोन्ही भावंडे पित्याच्या छत्राला पारखी झाली. त्यांची आई काबाडकष्ट करून दोन्ही मुलींचे पालनपोषण करण्याबरोबरच त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मोबाईलअभावी सध्या विद्यालयातून देण्यात येणारे ऑनलाईन शिक्षण त्यांना घेता येत नव्हते. यामुळे केपे महाविद्यालयाचे प्राचार्य जॉयदीप भट्टाचार्य यांनी पुरस्कृत केलेला मोबाईल प्रतिका हिला भेट देण्यात आला.

काणकोण
यावेळी दै. ‘गोमन्तक’चे वरिष्ठ छायाचित्रकार सोयरू कोमारपंत, श्रद्धानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर, वर्ग शिक्षिका स्वाती खोलकर, शिक्षिका तन्वी नाईक, तनूजा गायक, शिक्षक संकेत वारीक उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक सुभाष महाले यांच्या हस्ते मोबाईल भेट देण्यात आला.
यावेळी कोमारपंत म्हणाले, की शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात दै. ‘गोमन्तक’चे भरीव योगदान आहे. मडकई होडी दुर्घटना, तेरेखोलवीर आल्फ्रेड आफोंसो यांच्या कुटुंबासाठी दै. ‘गोमन्तक’ने केलेल्या सामाजिक चळवळीची आठवण आजही ताजी आहे. दै. ‘गोमन्तक’च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल मिळवून देणे हा त्यातीलच एक समाजकार्याचा भाग आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेण्यास एका मुलीच्या आईला दागिने विकण्याची वेळ आली यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. खास विद्यार्थ्यांच्या शिक्षिका स्नेहल वेरेकर यांनी ती बातमी फेसबुकवर अपलोड केली होती. त्यानंतर म्हापसा येथील दीपक मणेरीकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल मिळवून देण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जॉयदीप भट्टाचार्य यांनी मोबाईल पुरस्कृत केले आहेत.
मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर यांनी दै. ‘गोमन्तक’च्या या चळवळीची वाखाणणी केली. त्याचबरोबर पत्रकारिता करतानाच समाजकार्य करण्याच्या या कृतीबद्दल दै. ‘गोमन्तक’चे आभार मानले.

संबंधित बातम्या