विषाणूचा प्रादुर्भाव

अभिषेक गाडगीळ
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

महाभारत हा केवळ ग्रंथ नसून ते आपल्या भारतीय संस्कृतीच्या एका विशिष्ट कालखंडाबद्दल व आपल्या इतिहासाबद्दल माहिती देणारं एक महाकाव्य आहे. यामुळे महाभारताला ''पंचम वेद'' असंही म्हटलं जातं. 

महाभारत हा केवळ ग्रंथ नसून ते आपल्या भारतीय संस्कृतीच्या एका विशिष्ट कालखंडाबद्दल व आपल्या इतिहासाबद्दल माहिती देणारं एक महाकाव्य आहे. यामुळे महाभारताला ''पंचम वेद'' असंही म्हटलं जातं. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या संचारबंदीत लोकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने तीस वर्षांपूर्वीच्या ''रामायण '' व ''महाभारत'' या मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली. त्या वेळेपासून माझी महाभारताबद्दल रुची वाढली. तसं हा विषय गेली सहा-सात वर्ष माझ्या आवडीचा राहिला आहे, पण या सुटीमुळे मला महाभारत अभ्यासण्याचा भरपूर वेळ मिळाला. तेव्हा या लेखातून मी महाभारताची प्रासंगिकता व त्यातून मिळणारा बोध, यावर भाष्य करणार आहे. या लेखातील माझे विचार हे प्रामुख्याने राजेंद्र खेर लिखित ''धनंजय'', इरावती कर्वे लिखित ''युगान्त'',  कमला सुब्रमण्यम यांचं ''कथारूप महाभारत'' व या विषयावरील मी वाचलेले अनेक लेख यांचा मेळ घालून व्यक्त झालेले आहेत. 

आपण बऱ्याचदा असं ऐकतो की रामायण आपल्याला कसं वागायचं हे  शिकवते, तर महाभारत कसं वागू नये हे शिकवते. महाभारताविषयी जे वाक्य मी वर नमूद केले आहे, त्याच्याशी मी ७०टक्के सहमत आहे. हे म्हणण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण महाभारत वाचतो, तेव्हा आपल्याला सामाजिक जीवनात कसं वागावं, याच ज्ञान प्राप्त होतं. काही दिवसांपूर्वी मी युट्यूबवर महाभारताचं इंग्रजीत भाषांतर करणारे श्री. विवेक देबरॉय यांचं एक व्याख्यान ऐकलं. त्यात ते म्हणाले की महाभारताची ''वन पर्व'', शांती पर्व आणि अनुशासन पर्व, ही तीन पर्व ही प्रत्येक मानवाने शक्य असल्यास आवर्जून वाचावीत. कारण ह्या सर्व पर्वांमध्ये जे काही ज्ञानाचं भांडार आहे, ते मनुष्याला चांगलं आचरण ठेवायला मदत करतं. 

महाभारताविषयी जर एका वाक्यात बोलायचं झालं, तर ते पुढीलप्रमाणे असेल, ''यदि हस्ति तदन्यत्र, यन्नेहस्ति न तत क्वचित''. जे यात आहे, ते सर्वत्र आहे, जे यात नाही ते अन्य कुठेही नाही. यात सर्व विषयांवर भाष्य केले गेले आहे. यात राजनीती, कुटनीती, त्यावेळचा समाज, स्त्रियांची स्थिती, त्यांचं समाजातील स्थान, राजधर्म, यांसारख्या अनेक विषय हाताळले गेले आहेत. ही केवळ एका व्यक्तीची रचना नसून काळानुसार यात अनेक गोष्टी जोडल्या गेल्या.  याच रचनेच्या महत्त्वाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला, तो आज आपण ''भगवदगीता'' या रूपात अभ्यासतो. 

महाभारताची विशेषता ही आहे की यात राजनीती, राजाची कर्तव्ये, मनुष्याचे आचरण, धर्म व अधर्माची व्याख्या, या सर्व विषयांचे ज्ञान हे जास्तीतजास्त प्रमाणात कथांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. यात प्रामुख्याने भीष्म पितामहांनी कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर धर्मराज युधिष्ठिरास केलेला राजधर्माविषयीचा उपदेश, पांडवांच्या वनवासाच्या काळात महर्षी मार्कंडेय, आचार्य लोमास यांनी पांडवांना केलेला उपदेश यांचा समावेश होतो. माझ्या मते, महाभारत हा ग्रंथ कोणत्याही ठराविक समुदाय किंवा धर्मासाठी नसून तो समस्त मानव जातीसाठी आहे. हा ग्रंथ आपण जेव्हा जेव्हा अभ्यासतो, तेव्हा दरवेळी आपल्याला काही न काहीतरी नवीन बोध मिळतो. 

माझ्या मते, महाभारत हा केवळ ग्रंथ नसून ते आपल्या भारतीय संस्कृतीच्या एका विशिष्ट कालखंडाबद्दल व आपल्या इतिहासाबद्दल माहिती देणारं एक महाकाव्य आहे. यामुळे महाभारताला ''पंचम वेद'' असंही म्हटलं जातं. ही केवळ कौरव-पांडवांची संघर्ष कथा नसून आम्हा भारतीयांचं धर्मशास्त्र आहे. धर्माचा अधर्मावर, सत्याचा असत्यावर, सदाचाराचा दुराचारावरील विजय व धर्माचं महत्त्व आपल्याला यातून पटतं. माझ्या मते,  चांगलं आणि वाईट यात फरक कसा करावा हे आपल्याला महाभारताशिवाय अजून कोणताही ग्रंथ उत्तमरीत्या शिकवू शकत नाही. 

खरं तर ''महाभारत'' या विषयावर जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे.  पण शब्दमर्यादेमुळे मुद्दामच हा लेख थोडक्यात लिहावा लागला. यापुढे महाभारतातील अनेक गोष्टींवर माझे विचार सातत्याने पुढे आणायचा प्रयत्न करेन अशी मी सर्वांना ग्वाही देतो. 

संबंधित बातम्या