‘आप’च्या गोअन्स अगेन्स्ट कोरोना मोहिमेला आजपासून प्रारंभ

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

आम आदमी पक्षाचे सुमारे ४०० स्वयंसेवक प्रत्येक गावामध्ये लोकांची ऑक्सिमीटरने तपासणी करून कोरोनासंदर्भात जनजागृती करणार असल्याची माहिती पक्षाचे समन्वयक एल्विस गोम्स यांनी दिली. 

पणजी: कोरोनासंदर्भात ऑक्सिमित्रतर्फे प्राथमिक स्तरावर सुरू केलेल्या तपासणीला लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे घरोघरी कोरोनासंदर्भातची तपासणी करण्यासाठी ‘गोअन्स अगेंस्‍ट कोरोना’ ही मोहीम आजपासून सुरू करण्यात येत आहे. पक्षाचे सुमारे ४०० स्वयंसेवक प्रत्येक गावामध्ये लोकांची ऑक्सिमीटरने तपासणी करून कोरोनासंदर्भात जनजागृती करणार असल्याची माहिती पक्षाचे समन्वयक एल्विस गोम्स यांनी दिली. 

दोनापावल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गोम्स म्हणाले की, गोव्यातील सीमा खुल्या केल्‍यानंतर पर्यटक तसेच लोकांची कुठेच तपासणी केली जात नाही. जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसत असले, तरी कोरोनाबाधित रुग्णांचे व मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. घरातील अलगीकरण, कोविड निगा केंद्र, कोविड इस्पितळ उपचारावेळी होत असलेली हाताळणी तसेच सामान्य कोरोनाबाधित रुग्ण व अतिमहनीय व्यक्ती यांना देताना उपचारात देताना होत असलेले भेदभाव हे जनतेने पाहिले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची दरदिवशी माहिती देताना अचूक माहिती दडपली जात आहे. जादा रुग्ण वाढत असल्याची माहिती दिल्यास लोकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार होऊ शकते, याची सरकारला भीती आहे. दिल्लीतील आप सरकारने ज्याप्रकारे कोरोना समस्या हाताळली आहे, त्याप्रमाणेच गोव्यातही हाताळण्यासाठी ‘आप’ने हे अभियान सुरू केले आहे. या अभियानमार्फत ‘आप’ गावोगावी घराघरापर्यंत लोकांची ऑक्सिमीटरने तपासणी करण्यास पोहोचणार आहे. हे अभियान कोरोनाविरुद्धचा लढा देण्यासाठी असून त्यामध्ये राजकारण नाही. एकत्रितपणे याविरुद्ध लढा देण्यासाठी इतर पक्षाचे कार्यकर्तेही यामध्ये सहभागी होऊ शकतात, असे ते म्हणाले. 

चारशे ऑक्सिमित्र मोहिमेवर
या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती देताना ‘आप’चे नेते राहुल म्हांबरे म्हणाले, अभियानसाठी पक्षातर्फे ४०० स्वयंसेवक (ऑक्सिमित्र) नियुक्त करण्यात आले आहेत. लोकांनी स्वतःच्या आरोग्याबाबत माहिती घेण्यासाठी या स्वयंसेवकांकडून गावात आल्यावर ऑक्सिजनप्रमाण तपासून घ्यावे. घरात अलगीकरण असलेल्यांना कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतीच मदत स्थानिक प्रतिनिधींकडून होत नाही वा त्यांना अलगीकरणाच्या काळात सामानाचा पुरवठा केला जात नाही. कोविडच्या नावावर फक्त राजकारण सुरू आहे अशी टीका सुरेंद्र तिळवे यांनी केली.

राज्यात आज कोरोनाबाधित व्यक्तीला अस्पृश्‍‍यतेची भावना व वागणूक समाजाकडून दिली जाते. कोरोना विषाणूबाबत लोकांमध्ये जो गैरसमज आहे तो नष्ट करण्यासाठी ‘आप’ने हे अभियान सुरू केले आहे. दिल्लीत आप सरकारने सामाजिक संस्था तसेच विरोधकांना संघटित करून कोरोनाविरुद्धचा लढा राबविला त्यामध्ये यश आले आहे. तोच फॉर्म्युला गोव्यातही कोरोनाबाबत राबवून वाढणारे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एकत्रित काम करूया. - एल्‍विस गोम्‍स, ‘आप’चे समन्वयक

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या