भाताची कापणी सुरू, दरवर्षीपेक्षा उत्पन्न कमीच

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

यावर्षी पीक कापणीला आल्यावरच पावसाने घाला घातल्याने हाती कितपत धान्य पडेल या साशंकतेत राज्यातील शेतकरी बांधव आहेत. सध्या कापणी सुरू झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी पीक कमी प्रमाणात हाती लागणार असल्याचे सांगितले. 

पणजी : चांगल्या दरात जाईल आणि थोडेफार पैसे गाठीला लागतील म्हणून बळीराजा पेरणीपासून ते कापणीपर्यंत भाताच्या पिकाला पोटच्या लेकरासारखं जपतो. यावर्षी पीक कापणीला आल्यावरच पावसाने घाला घातल्याने हाती कितपत धान्य पडेल या साशंकतेत राज्यातील शेतकरी बांधव आहेत. सध्या कापणी सुरू झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी पीक कमी प्रमाणात हाती लागणार असल्याचे सांगितले. 

राज्यात यावर्षी भातपिकावर पावसाने काही प्रमाणात अन्यायच केला. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा कालावधी हा तांदळाच्या पिकासाठी महत्वाचा असतो. या कालावधीत पीक आकाराला येत असते. मात्र, यावर्षी या दोन्ही महिन्यात राज्यात वादळवाऱ्यासह पाऊस पडल्याने हाताशी आलेले पीक जमिनीला टेकले. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडल्यावर भातपिकाचा पैसा हाती लागणार नाही याची शाश्वती आम्हाला होती मात्र ऑकटोबरमध्ये झालेल्या पावसामुळे घरी खाण्यापुरता जो तांदूळ शेतात राहिला होता तोसुद्धा वाहून गेल्याची माहिती खांडोळा गावातील शेतकरी मधू गावकर यांनी बोलताना दिली. 

नेत्रावळी येथील काही शेतकऱ्यांनी यावर्षी सेंद्रिय भातशेतीचे प्रयोग केले होते. मात्र हि शेतीसुद्धा पाण्याखाली गेल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. शेतीमध्ये साठलेले पाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न केला तरी जमिनीवरील ओलाव्यामुळे सप्टेंबर महिन्यातच पिकांना नुकसान झाले होते, अशी माहिती नेत्रावळी येथील एका शेतकऱ्याने दिली. 

सत्तरी येथील सखल भागात असणाऱ्या शेतात पावसाचे पाणी घुसले. पाणी काढता येत नसल्याने आणि वाऱ्यामुळे पिक जमिनीवर झोपल्याने पीकही पाण्यात पडून कुजले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्धेच पीक येण्याचीही शक्यता आता कमी वाटत असल्याची माहिती अशोक नाईक यांनी दिली. 

‘भाताऐवजी चिखलच...’
‘एकमेका सहाय्य करू’ या तत्वावर आम्ही खांडोळा येथील सुमारे ४० शेतकरी एकत्रितपणे शेती करतो. दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याच्या गाठीला ३० ते ४० क्विंटल भात लागते. मात्र, यावर्षी काही पिशव्या लागतील अशी स्थिती आहे. जेव्हा मशीन घालून पीक काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत तेव्हा केवळ चिखल निघत असल्याची व्यथा शेतकरी मधू गावकर यांनी मांडली.

संबंधित बातम्या