Goa Politics: पणजीत तूर्त बाबूशचाच जोर!

पणजीत राजकारण गूढतेच्‍या पडद्यामागेच; अन्‍य मतदारसंघात इच्छुकांची प्रचार आघाडी
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

पणजी: पणजी (Panajim) शहराची व्याप्ती व पणजी विधानसभा (Assembly) मतदारसंघाची रचना जवळपास सारखीच आहे. राजधानीच्या शहराचा मतदारसंघ म्हणूनही या मतदारसंघाला महत्त्व आहे. याशिवाय १९९४ पासून सलगपणे हा मतदासंघ स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) हे जिंकत आल्याने या मतदारसंघाची चर्चा राष्ट्रीय पातळीवरही होत असे. पर्रीकरांचाच मतदारसंघ म्हणून तो अलीकडच्या वर्षांत ओळखला जात असे.

बदलली सत्तेची समीकरण

पर्रीकर यांच्या मृत्यूपर्यंत पणजी शहरावर बाबूश मोन्सेरात यांची तर विधानसभा मतदारसंघावर पर्रीकर यांची सत्ता होती. पणजीत भाजपचा उमेदवार निवडून येत असला, तरी शेजारील ताळगाव आणि सांताक्रुझमध्ये भाजपला आपला फारसा जम बसवता आलेला नाही. आता पणजीतील सत्तेची समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात यांनी विजय मिळवला. त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला, हा भाग बाजूला ठेवला तरी आजवर या मतदारसंघात निर्णायक ठरतील, अशी भाजपची मते आहेत. या समजाला यावेळी धक्का बसला. त्यावेळचे उमेदवार माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना दिलेली उमेदवारी आणि पर्रीकर यांचे पूत्र उत्पल यांना नाकारलेली उमेदवारी हे दोन्ही घटक भाजपला नडले, असे मानले जाते.

Goa Politics
Goa Politics: चिदंबरम यांच्याकडून युतीबाबत चर्चा शक्य

कसिनो जैसे थे!

मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर होणारी ही निवडणूक ते भाजपच्या उमेदवारीवर लढवतील, असे दिसते. सध्या पणजीतील भाजपचा कोणताही कार्यक्रम असो स्थानिक आमदार या नात्याने बाबूश यांना भाजपकडून दिला जाणारा मान पाहता तेच उमेदवारीचे दावेदार असतील. त्यांनी मागील निवडणुकीवेळी शंभर दिवसांत मांडवीतून कसिनो हटवतो, असे बहुचर्चित आश्वासन दिले होते.

विरोधक एकवटणार का?

गोवा सुरक्षा मंचकडून सुभाष वेलिंगकर यांनी निवडणूक लढवून झाकलेली सव्वालाखाची मुठ उघडून दाखवली आहे. यामुळे याखेपेला त्यांच्या पक्षाकडून कोण हा प्रश्न आहे. आम आदमी पक्षाकडून वाल्मिकी नाईक यांना उमेदवारी मिळेल. महानगरपालिका निवडणुकीवेळी वाल्मिकी यांनी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेसारखे सारे विरोधक त्यांच्यामागे एकवटणार का? हे पाहावे लागणार आहे. इतर मतदारसंघात इच्छूक कामाला लागले असले, तरी पणजीत त्या पातळीवर सामसूम आहे. कोणाही सामाजिक कार्यकर्त्याने आपण लढण्यास इच्छूक आहे, असेही म्हटलेले नाही.

सुरेंद्र फुर्तादोही इच्छूक

काँग्रेसच्या बाजूने कोण, हे अद्याप दृष्‍टिपथात नाही. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो हे निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. महानगरपालिका निवडणुकीत पत्नी रुथसह विजयी होत, त्यांनी आपली पकड सिद्ध केली असली, तरी त्यांना पूर्ण शहरभरात पाठिंबा मिळेल काय, हाही प्रश्न आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पणजीतून तगडा उमेदवार देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

Goa Politics
Goa Taxi: आम्ही तुम्हाला निवडून आणले, म्हणत टॅक्सी व्यावसायिकांची आमदार सोपटे यांच्याकडे चर्चा

‘मगो’ची मते ठरणार निर्णायक

पणजीत मगोचीही २५०० पारंपरिक मते आहेत. आजवर ती मते पर्रीकर यांच्या पारड्यात पडत होती, असे मानले तरी यापुढे ती निर्णायक ठरू शकतात. युती, आघाडीची शक्यता विचारात घेता या मतांची बेरीज-वजाबाकी नजरेसमोर ठेवावी लागेल. मोन्सेरात यांनी महिला मोर्चा व युवा मोर्चाच्या पणजी मतदारसंघ समित्या जाहीर करताना उपस्थित राहून लक्ष देत असल्याचे दाखवून दिले आहे.

‘मनपा’ बैठकीत नाराजी

पणजी महापौरपदी बाबूश यांनी आपले पूत्र रोहित यांना स्थान दिले. त्याआधी उदय मडकईकर हे महापौरपदी होते. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी गटात सारे काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. काल - परवाच झालेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत मडकईकर यांनी ज्या पद्धतीने आवाज चढवला, ते पाहता पुढे राजकीय फेरजुळणी आकाराला आली, तर आश्चर्य वाटू नये.

आजवरचे आमदार

  • १९६३ जॅक सिकेरा

  • १९६७ यशवंत देसाई

  • १९७२ बाबन नाईक

  • १९७७ माधव बीर

  • १९८० विष्णू नाईक

  • १९८४ जे. बी. गोन्साल्‍विस

  • १९८९ जे.बी. गोन्साल्‍विस

  • १९९४ ते २०१२ मनोहर पर्रीकर

  • २०१७ सि. कुंकळ्येकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com