'नो पार्कींग' मधील गाड्यांवरील कारवाईसाठी पणजीचे महापौर ग्राउंडवर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

General महापालिकेच्या नव्या टोईंग गाडीच्या कारवाईसाठी स्वतः महापौर रात्रीपासून पहाटे तीन वाजेपर्यंत जागले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पार्किंग नसलेल्या ठिकाणी असलेल्या वाहनांवर कारवाई केली. ७१ वाहनांवर कारवाई केल्याने एका रात्रीत २८ हजारांचा दंडाची रक्कम प्रशासकीय यंत्रणेच्या खाती जमा झाली. 

पणजी :  महापालिकेच्या नव्या टोईंग गाडीच्या कारवाईसाठी स्वतः महापौर रात्रीपासून पहाटे तीन वाजेपर्यंत जागले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पार्किंग नसलेल्या ठिकाणी असलेल्या वाहनांवर कारवाई केली. ७१ वाहनांवर कारवाई केल्याने एका रात्रीत २८ हजारांचा दंडाची रक्कम प्रशासकीय यंत्रणेच्या खाती जमा झाली. 

या महिन्याच्या ११ नोव्हेंबरला झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत टोईंग गाडीद्वारे रात्रभर पार्किंगचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला सर्वानुमते अनुमती मिळाली. त्यानुसार महापालिकेने खरेदी केलेल्या नव्या टोईंग गाडीद्वारे कारवाईला बुधवारी सुरुवात केली. त्यासाठी महापौर उदय मडकईकर यांना कारवाई होतेय की नाही, हे पाहण्यासाठी रात्र जागावी लागली. स्वतः वाहनाबरोबर राहिल्याने ८१ वाहनांवर महापालिकेने कारवाई केली.

पार्किंग नसलेल्या जागेत किंवा पार्किंगचे नियम मोडून उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई केल्यामुळे दंडाच्या रुपाने २८ हजार रुपयांचा महसूल मिळाला असला तरी त्यातील काही रक्कम पोलिस खात्याला जाणार आहे.  दरम्यान, आज आमदार बाबूश मोन्सेरात, आयुक्त संजित रॉड्रिग्स, वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सलीम शेख, पणजीचे वाहतूक नियंत्रण केंद्राचे पोलिस निरीक्षक यांच्यासह महापौर मडकईकर यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. त्यात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईला पोलिसांकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. परराज्यातून येणारी वाहने कशीही पार्क केली जातात. पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू झाल्यास यापुढे वाहनचालकांमध्ये शिस्त लागेल, असे मडकईकर म्हणाले. त्याचबरोबर आमदार मोन्सेरात यांनी काही सूचना मांडल्या.

संबंधित बातम्या