पणजी महापालिकेच्या सर्व तीसही जागा जिंकणार - मोन्सेरात

UNI
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

पणजी महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी येत्या आठ दिवसांमध्ये उमेदवार नक्की केले जातील.  त्याचबरोबर पणजी महापालिकेच्या सर्वच्या सर्व तीसही जागा आपले पॅनेल नक्कीच जिंकेल, असा विश्वास पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केला आहे.

पणजी - पणजी महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी येत्या आठ दिवसांमध्ये उमेदवार नक्की केले जातील. त्याचबरोबर पणजी महापालिकेच्या सर्वच्या सर्व तीसही जागा आपले पॅनेल नक्कीच जिंकेल, असा विश्वास पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केला आहे. आज उशिरा एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले, की पणजी महापालिकेवर गेली अनेक वर्षे आपल्या पॅनलची सत्ता आहे. मात्र, यावेळी सर्वच्या सर्व तीसही जागा जिंकण्याचे ध्येय आपण ठेवले आहे. त्यासाठी  भारतीय जनता पक्षाचे नेते व आपण मिळून उमेदवार चाचपणी सुरू केली असून येत्या आठवड्याभरात उमेदवारांची नावे नक्की केली जातील आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयातून ती भाजप नेत्याद्वारे घोषित केली जातील, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

प्रभागांच्या राखीवतेबाबत विचारणा केल्यानंतर मोन्सेरात  म्हणाले, की आपणासाठी प्रभागांची राखीवता महत्त्वाची नाही.  कारण आपण पणजीच्या सर्व तीसही  प्रभागांमध्ये काम करत असून आपले समर्थक सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये आहेत. त्यामुळे  राखीवतेचा कुठलाही फरक आपल्या पॅनलच्या विजयावर होणार नाही. तसेच प्रभाग राखीव  करण्यास आपण कोणालाही सांगितले नाही. नियमानुसार निवडणूक आयुक्त कार्यालयाने राखीवता केलेली आहे, असे उत्तर मोन्सेरात यांनी राखीवता विषयावर बोलताना दिले. 

पूर्ण ताकदीनिशी पालिका निवडणुकीत आपले पॅनल उतरणार असून भाजपचे जुने कार्यकर्ते व आपल्यासोबत भाजपात आलेले कार्यकर्ते यांचा समन्वय साधूनच उमेदवारी नक्की केली जाणार असल्याचे मोन्सेरात यांनी सांगितले.

उदय मडकईकर सुरक्षित
महापौर उदय मडकईकर यांचा विद्यमान प्रभाग राखीव झाला असला तरी प्रभाग फेररचनेमध्ये त्यांचा आत्ताचा नवा प्रभाग खुला आहे. त्यामुळे महापौर सुरक्षित असल्याचे आज स्पष्ट झाले.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या