
Goa Shigmotsav 2023 : गावातील शिगमोत्सव शहरात आणण्याचा पहिला प्रयत्न पणजी शिगमोत्सव समितीद्वारे करण्यात आला. गोव्याची खरी संस्कृती समजली. लोकसंस्कृती आणि लोककलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
यंदा शिगमोत्सव मिरवणूक शनिवार दि. 11 मार्च रोजी परंपरेप्रमाणे 18 जून मार्गेच निघणार आहे. त्यात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत येणाऱ्या कामांचा व्यत्यय येणार नाही, अशी ग्वाही पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी दिली. येथील गास्पर डायस सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक व खजिनदार संदीप नाईक उपस्थित होते. धेंपे म्हणाले, शासकीय शिगमोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी सदाच स्थानिक नेते असतात. गेली 35 वर्षे पणजीच्या आमदारांनी आम्हाला सहकार्य केले. कोरोनानंतर यंदा चित्ररथांचा सहभाग व उत्साह अधिक असेल.
मिरवणूक 10 पूर्वी आटोपती घ्या, अन्यथा…!
शिगमोत्सव मिरवणूक रात्री 10 पूर्वी संपणे गरजेचे आहे, अन्यथा साऊंड सिस्टम बंद केली जाईल, असा इशारा पर्यटन खाते, वाहतूक पोलिस व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यातील शिगमोत्सव समित्यांना देण्यात आला आहे.
त्यानुसार पणजीतील शिगमोत्सव मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी यासाठी रविवार दि. 5 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पणजी महानगपालिकेत रोमटामेळ, लोकनृत्य आणि चित्ररथ गटांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक बोलाविली असल्याचे समितीचे खजिनदास संदीप नाईक यांनी सांगितले.
भरगच्च कार्यक्रम; रुपरेषा जाहीर
7 ते 12 मार्चपर्यंत पणजी शिगमोत्सव समितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 7 रोजी सकाळी 9.30 नंतर पणजीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीला नमन करून रोमटामेळ आझाद मैदानाकडे प्रस्थान करेल. तेथे गुलालोत्सव साजरा होईल. सायंकाळी 7 वाजता ऑकेस्ट्रा होणार आहे.
8 रोजी सायंकाळी 7 वाजता ‘तेंगशेर कावळो, घोवाक दुवाळो’ हे कोकणी नाटक सादर केले जाईल. दि. 9 रोजी ‘मनोमय’ हा नृत्याचा कार्यक्रम तर 10 रोजी सायंकाळी 7 वाजता ‘शब्द सूर-भावरंग’ हा संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
11 रोजी भव्य शिगमोत्सव शोभायात्रेला सायंकाळी 4 वाजता सावरेश्वरापासून सुरवात होईल. तर, 12 रोजी सायंकाळी 7 वाजता ‘नार नखरेवाली’ हा लावणीचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
चित्ररथासाठी 60 हजार रुपये प्रथम बक्षीस
चित्ररथासाठी प्रथम बक्षीस 60 हजार रुपये, द्वितीय 50 हजार, तृतीय 40 हजार तर उत्तेजनार्थ सात बक्षिसे देण्यात येणार आहेत. रोमटामेळासाठी प्रथम 35 हजार, द्वितीय 25 हजार, तृतीय 15 हजार, चतुर्थ 10 हजार तर पंचम बक्षीस 8 हजार तसेच 7 हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे असतील.
शिवाय चित्ररथ व रोमटामेळासाठी धेंपे ग्रुप कंपनीने एकूण 70 हजार रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत. लोकनृत्यसाठी 15 बक्षिसे, वेशभूषेसाठी मोठ्या गटाला 14 बक्षिसे तर लहान गटासाठी 13 बक्षिसे असतील. एकूण बक्षिसांची रक्कम 6 लाख 70 हजार एवढी आहे.
दरम्यान, चित्ररथासाठी मंगलदास नाईक यांनी आपल्या मातोश्री स्व. श्रीमती नाईक यांच्या स्मरणार्थ फिरता चषक, रोमटामेळासाठी किशोर नार्वेकर यांनी आपले बंधू स्व. कृष्णा नार्वेकर यांच्या स्मरणार्थ चषक व सुनील अनंत नाईक यांनी आपल्या मातोश्री स्व. सुशिलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ फिरते चषक ठेवले आहेत. यंदा २५ चित्ररथ व 10 रोमटामेळ असतील.
विकासकामे अडवू शकत नाही : महापौर
पणजी महानगरपालिकेच्या अखत्यारित सुरू असलेली विकासकामे आपण अडवू शकत नाही. पण मनपाद्वारे शिगमोत्सव समितीला आयोजनात जे सहकार्य लागेल, ते देण्यास आम्ही तयार आहोत. सोबतच वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.
तीन कलाकारांचा सत्कार
शिगमोत्सव समितीद्वारे दरवर्षी कलाकारांचा सत्कार केला जातो. यंदाही ज्येष्ठ मूर्तिकार झिलू दत्ताराम हरमलकर, तियात्रिस्त रिझर डिमेलो आणि ज्येष्ठ नाट्यकलाकार विद्याधर शिरोडकर यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे धेंपे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.