पणजी मार्केट सोमवारपर्यंत बंद 

dainik gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

पणजी महापालिकेत चिंबल भागाली ६१ कर्मचारी काम करतात, त्यांना सात दिवस ब्रेक देण्यात आला आहे. त्यांची कोविड - १९ चाचणी घेतली जाणार आहे व त्याचा अहवाल येईपर्यंत कामावर न येता घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे.

पणजी

पणजीतील मासळी मार्केट परिसरातील एका तावेर्नाचा मालक कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. तसेच एक भाजी विक्रेतीही संशयित असल्याचा संभव आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना व दुकानधारकांना होऊ नये, यासाठी उद्या १२ ते १५ जूनपर्यंत चार दिवस पणजी मार्केट बंद राहणार आहे. या बंदमध्ये नवे मार्केट संकुल, मासळी मार्केट तसेच मटण व चिकन विक्रेत्यांचा समावेश असल्‍याची माहिती पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली. 
चिंबल येथे कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ज्या भाजी विक्रेतीचा संशय आहे ती चिंबल येथील असून तेथील काहींची चाचणी करण्यात आली आहे, त्यामध्ये या विक्रेतीचा समावेश आहे. पणजी महापालिकेत चिंबल भागाली ६१ कर्मचारी काम करतात, त्यांना सात दिवस ब्रेक देण्यात आला आहे. त्यांची कोविड - १९ चाचणी घेतली जाणार आहे व त्याचा अहवाल येईपर्यंत कामावर न येता घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. वास्कोतील मांगोल हिल येथील तीन कर्मचारी महापालिकेत आहेत त्यांना गेल्या सोमवारपासून कामावर येऊ नये, असे सांगितलेले आहे. उद्या १२ रोजी सकाळी पणजी मार्केट निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. 
पणजी मार्केट पुढील चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महापालिका मार्केट समिती, नगरसेवक तसेच मार्केट समितीशी चर्चा करून घेण्यात आला आहे. हे मार्केट महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याने हा निर्णय स्वेच्छेने लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी या बंद काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल कळ सोसावी, असे मडकईकर म्हणाले. 
मासळी मार्केट येथे ज्या ठिकाणी मासे कापून स्वच्छ करून दिले जातात तेथे एक तावेर्न आहे. हे तावेर्न टाळेबंदीच्या काळात बंद होते. हे तावेर्न दोघा नेपाळी तरुणानी भाडेपट्टीवर चालविण्यास घेतले आहे. चार दिवसापूर्वी हे नेपाळी दिल्लीहून गोव्यात आले. त्यांनी तावेर्न साफसफाईसाठी खुले केले. या तावेर्नमध्ये पणजी महापालिकेचे सफाई कामगार तसेच मार्केटमधील काही हमाल दारू पिण्यासाठी जातात. हे तावेर्न साफसफाईसाठी खुले करण्यात आल्यावर काही महापालिका कामगार व हमाल या नेपाळी तरुणाकडे गेले होते. या दोन नेपाळी तरुणापैकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह तर एकाचा पॉझिटिव्ह आल्याचे काल कळविण्यात आले. त्याची चाचणी करताना अर्जात दिलेल्या माहितीत मार्केटातील तावेर्नाचा पत्ता व मोबाईल दिला होता. त्यामुळे या पत्त्यावर कालपासून पोलिस त्याचा शोध आहेत मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नव्हता. 
या तावेर्नमध्ये महापालिकेचे चतुर्थ श्रेणीतील कामगार दारू पिण्यासाठी जातात हे अनेकांना माहीत आहे. त्या दिवशीही काही कामगार तावेर्नमध्ये गेले होते, त्यावेळी हे दोघेही नेपाळी तरुण होते. या कामगारांची महापालिकेने बोलावून चौकशी केली. मात्र, त्यांनी तावेर्नमध्ये गेलो नसल्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र, त्या ठिकाणी गेलेल्या काही कामगारांची माहिती महापालिकेला असून त्यांचीही कोरोना चाचणी करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. 
 

 

संबंधित बातम्या