'भाजपला मिळालेले यश‌ हे जन आंदोलनाच्या नावावर सरकारची अडवणूक करणाऱ्यांना चपराक'

'भाजपला मिळालेले यश‌ हे जन आंदोलनाच्या नावावर सरकारची अडवणूक करणाऱ्यांना चपराक'
vuday madakaikar

पणजी- जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश‌ हे जन आंदोलनाच्या नावावर सरकारची अडवणूक करणाऱ्यांना चपराक आहे, असा टोला पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी लगावला आहे. 

भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ते म्हणाले, 'आता होणाऱ्या पालिका निवडणुकांतही भाजपला यश मिळेल. महापालिकेच्या निवडणुकीत आमदार आतानासिओ मोन्सेरात यांचे पॅनल विरोधात भाजप असा सामना होता. आता मोन्सेरात हे भाजपमध्ये गेल्याने महापालिकेच्या निवडणुकीत मोन्सेरात व भाजपची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.  

आभासी बैठकांचे फलित

भाजपने कोविड महामारीच्या काळात आपल्या पक्षाच्या संघटनेला कार्यरत ठेवले. आभासी बैठकांच्या माध्यमातून पक्ष संघटनेला लक्ष्य दिले. कधीतरी जिल्हा पंचायत निवडणूक घ्यावीच लागेल याचे भान ठेऊन मतदार बैठका घेणे सुरू ठेवले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर प्रचाराला परवानी दिली नव्हती, तरी त्याचा मोठा फटका भाजपला बसला नाही. भाजपच्या पराभूत उमेदवारांना मात्र बंडाळीचा फटका बसला आहे. त्याकडे आता भाजपला लक्ष पुरवावे लागणार आहे. भाजपने या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ३३ जण विजयी झाले. यामुळे भाजपने या निवडणुकीच्या परीक्षेत ८०.५ टक्के गुण मिळवल्याचे दिसते. राज्यात २००० साली जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांना सुरवात झाली, तेव्हापासून आजवर कोणत्याही एका पक्षाला जिल्हा पंचायत निवडणुकीत असे यश मिळालेले नव्हते.

कळंगुटमध्ये माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व जोसेफ सिक्वेरा अशा दोन प्रबळ स्थानिक नेत्यांचे मोठे आव्हान असताना तसेच त्या भागात सरकारविरोधात विविध समाजघटकांकडून झालेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मायकल लोबो यांचा कळंगुट हा बालेकिल्ला उद्‍ध्वस्त होतोय की काय, अशी परिस्थिती होती. तथापि, त्याबाबत सुमारे पाचशे मतांच्या मताधिक्क्यांनी भाजप उमेदवार तिथे निवडून आला. सुकूर मतदारसंघातही भाजपचा उमेदवार पाचशे मतांनी का असेना निवडून आणणे लोबो व भाजप कार्यकर्त्यांना शक्य झाले. त्या ठिकाणी त्यांना आमदार रोहन खंवटे व जयेश साळगावकर यांच्या राजकीय डावपेचांचा प्रखर सामना करावा लागला. कळंगुट मतदारसंघ राखण्यात, तर सुकूर मतदारसंघातील बलाढ्य आमदाराला चीत करण्यात अखेर त्यांना यश आले. तात्पर्य, मायकल लोबो दुसऱ्या मतदारसंघातील आमदार खंवटे यांना वरचढ ठरलेच!

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com