महापालिकेच्या तपासणीत ४० दुकाने विनापरवाना; तत्काळ परवाने घेण्याची सूचना

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांचा कचरा उचलण्याचे काम महापालिका करीत होती. नैतिकता बाळगून या व्यापाऱ्यांनी व्यापार परवाना घ्यायला हवा होता. आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई केली असती, पण सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही त्यांना केवळ परवाना घेण्याची सक्ती केली आहे.  - उदय मडकईकर, महापौर

पणजी: पणजी महापालिकेने सुरू केलेल्या व्यापार परवाना तपासणीत ४० दुकानदार विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे.  या दुकानदारांना तत्काळ परवाना घेण्याची सूचना केली असून त्यांच्याकडून त्याविषयीचे अर्ज भरून घेतले आहेत. 

शहारात काही दुकानदार एका व्यापार परवान्यावर दोन व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन एक आठवड्यापूर्वी महापौर उदय मडकईकर यांनी महापालिका निरीक्षकांना आपल्या कार्य क्षेत्रातील दुकानांचा व्यापार परवाना तपासण्यास सांगितले होते. त्याचबरोबर त्याचा अहवाल दोन दिवसांत देण्यास सांगितले होते. परंतु काही निरीक्षक रजेवर गेल्याने हा अहवाल सादरीकरणास विलंब झाला होता. 

अखेर निरीक्षकांनी आपला अहवाल महापौरांना सादर केला असून त्यात ४० दुकानांनी व्यापार परवाना घेतला नसल्याचे उघड झाले. 

एका व्यापार परवान्यासाठी दहा हजार रुपये या व्यवसायांकाकडून घेतले जाणार असून सुमारे ४ लाख रुपयांचा महसूल महापालिकेला मिळणार आहे. त्याशिवाय सध्या शहराचा अर्धा भाग तपासणी करण्यात आलेला असून उर्वरित भाग तपासणे बाकी आहे.

जे दुकानदार दोन व्यवसाय करीत आहेत, त्यांना दुसऱ्या व्यवसायासाठी परवाना घेण्यास सांगण्यात आले आहे. परवाना नाही घेतला, तर दुसरा व्यवसाय बंद करण्याबरोबरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापौर उदय मडकईकर यांनी दिला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या