आठ नगरसेवकांना पुन्हा संधी!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

पक्षाचा निर्णय अंतिम राहणार असला तरी मोन्सेरात यांची आत्तापर्यंतची महापालिकेवरील असलेली पकड पाहता पक्ष त्यांना उमेदवार निवडणुकीत झुकते माफ देईल, हे स्पष्ट आहे. दरम्यान, पहिल्या चर्चेत विद्यमान नगरसेवकांपैकी आठ उमेदवारांना पुन्हा तिकीट मिळण्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. 

पणजी: पणजी महापालिका निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अनेक इच्छुकांनी आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयाचे उंबरेही झिजवले आहेत. पक्षाचा निर्णय अंतिम राहणार असला तरी मोन्सेरात यांची आत्तापर्यंतची महापालिकेवरील असलेली पकड पाहता पक्ष त्यांना उमेदवार निवडणुकीत झुकते माफ देईल, हे स्पष्ट आहे. दरम्यान, पहिल्या चर्चेत विद्यमान नगरसेवकांपैकी आठ उमेदवारांना पुन्हा तिकीट मिळण्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. 

महापालिकेत भाजपचे आमदार मोन्सेरात यांची पूर्णतः एकहाती सत्ता आहे. चार नगरसेवकांचा सध्याचा सवतासुभा पाहता महापालिकेत २६ जणांचे पाठबळ आमदार मोन्सेरात यांच्या हातात आहे. मोन्सेरात यांनी येत्या निवडणुकीत ३० ही नगरसेवक आपलेच निवडून येणार असा आत्मविश्‍वास व्यक्त केला आहे. माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, त्यांच्या पत्नी रुथ फुर्तादो, रायबंदरचे नगरसेवक रूपेश हळर्णकर आणि त्यांच्या पत्नी आरती हळर्णकर हे विरोधी गटात असल्याचे म्हटले तरी चालू शकते. 
महापालिका निवडणुकीत आमदार मोन्सेरात यांच्यावरच पक्षाने निर्णय प्रक्रिया सोपविली तर झारीतील शुक्राचार्यांना शह बसला जाणार आहे. मात्र, उमेदवार निवडीत पक्षाने हस्तक्षेप केला तर मोन्सेरात यांच्याविरुद्ध पडद्याआड राहून काम करणारा भाजपमधील एक गट आपल्या हस्तकांची (उमेदवारांची) नावे पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

भाजपच्या काही महिलांच्या पतींनी सध्याचा प्रभाग खुला झाल्यास निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काहींनी इच्छुक प्रभागांतून चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत आमदार मोन्सेरात यांच्या करिष्म्यावर महापालिकेत त्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी तीन-चार वेळा निवडून येण्याची किमया साधली आहे, त्या प्रभागात दुसऱ्या उमेदवारांची चाचपणीही आमदार गटाने केली आहे. दुसरी एक बाब म्हणजे आगामी निवडणूक लढणार नाही, असे सांगणारे काही विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

संबंधित बातम्या