Panjim Smart City : नावाची स्मार्टसिटी; खराब रस्त्यांमुळे पणजी-मिरामार प्रवासासाठी लागताहेत तब्बल 40 मिनिटे

पणजीतील इतर ठिकाणचे रस्ते खोदून सहा महिने वर्ष गेले तरी ते पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे काम महिन्याभरात पूर्ण होणे अशक्य आहे.
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak

Panjim Smart City : राजधानीत योग्य नियोजन न करता रस्ते खोदले जात असल्याने नागरिकांसह पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महालक्ष्मी मंदिरापासून सरस्वती मंदिर वाचनालयापर्यंतचा रस्ता खोदल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना या धुळीची समस्या अधिक जाणवत आहेत. तसेच धुळीमुळे श्‍वसनाचे त्रासही उद्भवत आहेत.

पणजीकरांना खोदकामांमुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाचा सामना तर करावा लागतोच, शिवाय पाच मिनिटांच्या अंतरासाठी पंधरा ते वीस मिनिटांचे अंतर जावे लागत आहे. सर्वत्र खोदकाम केल्याने एक ना धड भाराभर चिंध्या असा अनागोंदी कारभार महानगरपालिका करत असल्याचे पणजीकरांचे मत आहे. पणजी बसस्थानकापासून ते मिरामारपर्यंत जाण्यासाठी तब्बल 40 मिनिटांचा वेळ लागत असल्याने पणजीकर मात्र चांगलेच वैतागले आहेत.

श्री महालक्ष्मी मंदिर ते सरस्वती मंदिरपर्यंतचा रस्ता खोदला आहे. रस्‍त्याच्या दोन्ही बाजूंना पदपथ बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास महिन्याहून अधिक काळ लागणार असल्याचे चित्र आहे. कारण पणजीतील इतर ठिकाणचे रस्ते खोदून सहा महिने वर्ष गेले तरी ते पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे काम महिन्याभरात पूर्ण होणे अशक्य आहे.

भाविकांना होतोय त्रास

पणजीचे ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. मात्र, सध्या ज्या पद्धतीने मंदिरासमोरील रस्त्यावर गटारे खोदून ठेवली आहेत तसेच रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे देवस्थानात येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरच गाडी पार्क करावी लागत असल्याने पार्किंगसाठी गाड्यांची रीघ लागते. त्यामुळे इतर प्रवासी गाड्यांना तेथे अडचण होऊन अनेकदा वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत.

अनेक महिन्यांपासून काम अपूर्ण; खड्डे आणि धुळीत हरवली स्मार्ट सिटी

शहरातील अनेक भागात गेले अनेक महिने काम सुरू आहे. मात्र, काही केल्यास ते काम पूर्णत्वास जात नाही. प्रामुख्याने हिंदू फार्मसी, मळा परिसर, मारुतीगड परिसर अशा अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यासोबतच स्मार्ट सिटीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तर बहुतांश ठिकाणी पुन्हा पुन्हा खोदकाम करून चांगले रस्तेही खराब करून टाकले आहेत.

Panjim Smart City
Goa Mackerel Price : बांगड्यांचा 15 वर्षातील विक्रमी बंपर कॅच; गोव्यातील मच्छिमारांची चांदी

धुळीने माखल्या इमारती

शहर परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या खोदकामांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून अनेक इमारती धुळीने माखल्या आहेत. रस्त्यावरून गाडी चालविणे सोडा, साधे चालणेही मुश्कील झाले आहे. वाहनचालकांच्या हेल्मेट तसेच अंगावर धुळीचा थर साचतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर टँकरने पाण्याची फवारणी करण्याची गरज आहे.

व्यवसायावर परिणाम

पणजीत मध्यवर्ती भागातच खोदकाम केल्याने या परिसरातील विविध प्रकारच्या व्यापाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. राज्यात काही दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे. अशावेळी अनेक नागरिक विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरात येतात. मात्र, ऐन हंगामात महानगरपालिकेद्वारे खोदकाम सुरू असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.

पुलाचे काम रखडले

सांडपाणी प्रकल्पासमोरील पूल बांधणीच्या कामाला वर्ष होत आले, परंतु अजूनही हे काम पूर्ण होत नसल्याने अनेक नागरिक खोदकाम पाहतात आणि आपली वाट वळवतात. अनेकांना येथे काम सुरू असल्याची कल्पना नाही. त्यामुळे अनभिज्ञ नागरिकांना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.

अग्निशमन ते बालभवन रस्ता फोडला

अग्निशमन खात्याचे मुख्यालय ते बालभवन हा रस्ता पूर्णपणे खोदून काढला आहे. काही भागात खडी टाकली आहे, तर बहुतांशी भागात खडीकरण त्यानंतर डांबरीकरण अशी प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी वेळ जाणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे सर्वत्र फोडाफोडी कितपत योग्य आहे असा सवाल नागरिक उपस्थित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com