
Panjim: पाटोतील मलनिस्सारणाच्या वाहिन्या टाकण्याचे काम करण्यासाठी खोदलेल्या ठिकाणच्या ऑप्टिकल्स केबल तुटल्यामुळे आठवड्याचे काम आता महिन्यावर गेले आहे. या कामामुळे दुसऱ्या चेंबरमधील सांडपाणी संबंधित कंत्राटदाराने कला व संस्कृती खात्याच्या जवळील मोकळ्या जागेत सोडले आहे.
त्यामुळे सध्या या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याची तक्रार कला व संस्कृती खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कला व संस्कृती भवनातील कर्मचाऱ्यांना यापूर्वी डेंग्यू झाला होता. सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाटो परिसरातील इमारतीचे मलनिस्सारण पाणी वाहिन्यांद्वारे येथे उभारलेल्या नव्या प्रकल्पात नेले जाणार आहे.
कला व संस्कृती खात्याच्या जवळच चेंबरजवळून वाहिनी टाकण्याचे काम करण्यासाठी खोदकाम केले होते; परंतु त्या खोदकामात रस्त्याच्या मध्यभागातून गेलेल्या ऑप्टिकल केबल्स तुटल्या, त्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर खड्ड्याचा व्यास आणखी वाढला.
काही दिवसांचे असणारे काम आता महिना होत आला तरी चालू आहे. सध्या जेसीबीच्या साह्याने या ठिकाणी काम सुरू आहे. तर दुसऱ्या चेंबरमधील सांडपाणी पंप लावून पाणी उपसले आणि ते कला व संस्कृती खात्याच्या इमारतीजवळील सरकारी मोकळ्या जागेत सोडण्यात आले; परंतु दुर्गंधी पसरल्यानंतर त्याचा येथील ये-जा करणाऱ्या लोकांना व कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागला.
दुपारच्यावेळी कर्मचाऱ्यांना जेवणही करावेसे वाटत नव्हते; एवढी दुर्गंधी होती, असे कला व संस्कृतीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला पाणी सोडण्यास बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनी ते बंद केले आणि दुसरीकडे काही अंतरावर ते पाणी सोडण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.