गोवा प्रवेशाचा पॅरासिटॉमॉल मार्ग

Dainik Gomantak
गुरुवार, 14 मे 2020

रेल्वेतून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी हे बिगर गोमंतकीय आहेत. त्यांची येथे राहण्याची कोणतीच व्यवस्था नाही. हॉटेलही बंद आहेत. राज्यासमोर अशा मोठ्या प्रमाणावर विनाकारण येणाऱ्यांची मोठी चिंता आहे.

पणजी
गोव्‍याच्या सिमेवरून लोकांना राज्यात प्रवेश देताना केवळ शरीराचे तापमान थर्मल गनने मोजले जाते. एखाद्याने प्रवेशाच्या दोन तास अगोदर पॅरासिटामॉल औषध घेतले असेल तर तो तापमान मोजण्यातून सुटू शकतो (म्हणजे त्याला ताप आहे हे समजणार नाही) अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आजवर सिमेवर कोविड चाचणी करूनच सरकार प्रवेश देते असा जनतेचा सार्वत्रिक समज होता.
कोविड १९ चा संसर्ग झालेला ट्रक चालक ४ मे रोजी गोव्यात येऊन गेला होता याकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, सिमेवर मोठी गर्दी असते. त्यातून एखाद दुसरा तपासणीतून सुटूही शकतो, ती शक्यता नाकारता येत नाही. त्यात एखाद्याने पॅरासिटामॉल औषधाचे सेवन केले तर त्याच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण म्हणूनच नोंद होणार तीही शक्यता आहे. वापी गुजरात येथून तो ट्रक चालक राज्यात आल्यावर त्याच्यात काही लक्षणे दिसल्याची माहिती काही जागृत नागरीकांकडून मिळाल्याने त्याची चाचणी केली. त्या पहिल्या चाचणीत त्याला लागण झाल्याचे दिसल्याने खात्री करण्यासाठी दुसरी प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली. त्यातही लागण झाल्याने त्याला कोविड इस्पितळात उपचारासाठी पाठवले आहे. तो गोव्यात माल उतरवण्यासाठी आला होता, एक दोन ठिकाणी गेला होता. तेथील सर्वांना अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.
दुसऱ्या बाबतीत पाच जणांचे एक कुटुंब व त्यांचा चालक यांना सिमेवरच लक्षणे आढळली. ते सर्वजण महाराष्ट्रातून आले होते. त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात लागण झाल्याचे दिसल्याने खात्री करण्यासाठी दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. सिमेवर अहोरात्र सरकारी कर्मचारी गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना तपासत आहेत, माहिती नोंदवून घेत आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळेच हे कुटुंब कोविडची लागण झाल्याचे दिसून आले, असे ते म्हणाले. या सहा जणांना कोविडची लक्षणे नाहीत तर ट्रक चालकाला लक्षणे आहेत. सात पैकी पाच जण गोमंतकीय आहेत तर दोघे चालक आहेत. गोवा आता कोणत्या विभागात हे केंद्र सरकारच ठरवेल.

रेल्वेतून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी हे बिगर गोमंतकीय आहेत. त्यांची येथे राहण्याची कोणतीच व्यवस्था नाही. हॉटेलही बंद आहेत. राज्यासमोर अशा मोठ्या प्रमाणावर विनाकारण येणाऱ्यांची मोठी चिंता आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या चिंतेची कल्पना दिली आहे. यावर त्यांनी अभ्यास करून निर्णय घेऊ असे त्यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या