पर्वरीत पाण्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरीकांचा पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

दैनंदिन कामे करण्यासाठी पुरेशे पाणी मिळाले नसल्याने आज संतप्त नागरिकांनी स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली येथील पाणीपुरवठा धडक मोर्चा  नेऊन तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.

पर्वरी : ऐन दिवाळीच्या दिवसात पर्वरी आणि आजूबाजूच्या परिसरात अनियमित पाणीपुरवठामुळे  कोरडे पडल्याने  ग्रामस्थांचे बरेच हाल होत आहेत. त्यांना दैनंदिन कामे करण्यासाठी पुरेशे पाणी मिळाले नसल्याने आज संतप्त नागरिकांनी स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली येथील पाणीपुरवठा धडक मोर्चा  नेऊन तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. जर हे पाणीपुरवठा कार्यालय  येथील लोकांना व्यवस्थितपणे पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहे तर या कार्यालयाला आम्ही कुलूप ठोकतो.असे आमदार  खंवटे यांनी सांगून कुलूप ठोकण्यास गेले असता पोलिस आणि कार्यकर्ते यांची झटापट झाली.त्यावेळी पर्वरी पोलीस निरीक्षक निनाद देऊळकर आणि पुरुष पोलिसांनी महिलांना ढकलले असा आरोप आमदार  खंवटे यांनी केला.तसेच सात दिवसांच्या आत जर सुरळीत पाणीपुरवठा केला नाही तर  येथील पाणीपुरवठा कार्यालय विभाग १७ याला टाळे ठोकून मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, तसेच उत्तर गोवा अधीक्षक यांच्या बंगल्यासमोर धरणे धरणार असल्याचा इशारा खंवटे यांनी दिला आहे.

यावेळी आमदार  खंवटे यांच्या समवेत पेन्ह दि फ्रांक सरपंच स्वप्नील चोडणकर ,साल्वादोर दि मुंड सरपंच संदीप साळगावकर ,पंच श्याम सुंदर कामत, जिल्हा पंचायत सदस्य वैशाली सातर्डेकर, तिन्ही पंचायतीचे पंच तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पर्वरी पठार हा परिसर खडकाळ असल्याने येथे एकही विहीर नाही.त्यामुळे येथील लोकांना पूर्णतः नळाद्वारे केलेल्या  पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते.अनेक वेळा ग्रामस्थांनी खात्याला किमान टेंकरव्दारे पाणीपुरवठा करा म्हणून विनवणी केली तरीही ते ऐकत नाहीत.पण दुसऱ्या बाजूने आपल्या मर्जीतल्या लोकांना त्वरित पाणीपुरवठा करताना दिसत आहे. या  मतदारसंघात अनेक ठिकाणी गेली अनेक दिवसापासून व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.यापूर्वी वेळोवेळी या कार्यालयात निवेदने दिली, मोर्चा नेऊन झाले पण खात्यातील अधिकारी एक दोन दिवस व्यवस्थित पाणी पुरवठा करतात. पण नंतर ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती आहे. जर पाणीपुरवठा खाते आठ दिवसाच्या आत कार्यवाही करत नाही तर आम्ही या कार्यालयाला टाळे ठोकणार हे निश्चित आहे.त्यावेळी जर आम्हाला अटक करण्यात आली तरीही आम्ही अटक होण्यास तयार आहोत, असे  आमदार खवटे यांनी इशारा दिला आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता नितीन पाळंदीकर यात लक्ष घालून दोन चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करतो असे आश्वासन दिली. 

या मतदार संघातील तिन्हीय पंचायतीत नियोजनशून्य विकास कामे राबविली जात असून कोणाचा धरबंद कोणालाच नाही.असे एकंदरीत चित्र पाहता दिसते.जो तो आपल्या मर्जीतल्या लोकांना बांधकाम परवाने देत सुटला आहे.आपल्या परिसरात येणाऱ्या लोकांना पाणीपुरवठा करण्याची  क्षमता आहे कि नाही याचा विचार कोणीच करत नाही. त्यात वरिष्ठ अधिकारी वशिल्यावर आपल्याला हवे त्या बाजूने वळवून पाणीपुरवठा करताना दिसत आहे.

खात्याने त्वरित पाणी समस्येवर उपाय करण्यास प्राधान्य द्यावे. तांत्रिक कारणामुळे जर सद्या नळाव्दारे  पाणीपुरवठा करणे शक्य नसेल तर टेंकरव्दारे पाणी पुरवठा करावा अशी सूचना कर्मचाऱ्यांना द्याव्या ,कारण आम्ही फोन केले तर ते फोन कॉल्स घेत नाहीत आणि सुदैवाने उचलला तर थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ मारून नेतात.असे खंवटे यांनी सांगितले.
गोव्यातील लोकांचा दिवाळी  हा सर्वात मोठा तसेच जिव्हाळ्याचा सण आहे आणि ऐन दिवाळीच्या  दिवसात हा पाण्याचा तुटवडा होत असल्यामुळे ग्रामस्थ बरेच चिडले आहेत त्यात गेली अनेक वर्षे पाणी साठविण्याच्या टाक्यांची क्षमता वाढवली नाही .त्यामुळे पाणीपुरवठा  व्यवस्थेवर ताण पडतो. त्यात येथील जबाबदार अधिकारी तांत्रिक बिगाड झाला आहे.अशी करणे पुढे करतात.हे बरोबर नाही असे पंच श्याम सुंदर कामत  यांनी सांगितले.

सद्या आम्हाला  सातशे रुपये खर्च करून टेंकर मागवून आमची पाण्यावरील तहान भागवित आहेत.पण हे किती दिवस चालणार? असा सवालही ते करीत आहे. त्यात गेल्या महिन्यात नळाचे बिल दुप्पट आल्याने नागरिक संतापले आहेत.त्यांच्या मते नियमित पाणीपुरवठा होत नाही आम्ही टेंकरव्दारे पाणी आणून वापरतो आणि दुसऱ्या बाजूने पाणीपुरवठा खाते  आमच्या कडून दुप्पट बिल वसूल  करून घेत आहे.हा आमच्यावर अन्याय आहे.त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूने आर्थिक फटका बसतो. खात्याने त्वरित पाणी समस्येवर उपाय करण्यास प्राधान्य द्यावे तांत्रिक कारणामुळे जर सद्या नळाव्दारे  पाणीपुरवठा करणे शक्य नसेल तर टेंकरव्दारे पाणी पुरवठा करावा अशी सूचना कर्मचाऱ्यांना द्याव्यात. असे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक (क्राइम)शोबित सक्सेना, उपाधीक्षक एडविन कुलासो,निरीक्षक निनाद देऊलकर व अन्य पोलीस मोठ्या फौजफाट्या सह उपस्थित होते.

आणखी वाचा:

नेरूल गावामध्ये कोरोना संकटाबरोबर एक नविन संकट उभे...

संबंधित बातम्या