अकरावी प्रवेशासाठी पाल्यासह पालकांचीही धावाधाव! 

विलास महाडिक
शुक्रवार, 31 जुलै 2020

विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी निश्‍चित केलेल्या गुणांची टक्केवारी बहुतेक शाळांमध्ये ८५ टक्के असल्याने ८० ते ८४ टक्के गुण मिळवलेल्या पाल्याबरोबर पालकही प्रवेश मिळेल की नाही याच्या तणावात दिसत होते.

पणजी

गोवा शालान्‍त मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच बहुतेक उच्च माध्यमिक हायस्कूलच्या व्यवस्थापनाने अकरावीसाठीची प्रवेशपुस्तिका एका आठवड्यापूर्वी विक्री केल्या होत्या. मात्र, त्याबाबत अनभिज्ञ असलेल्या पाल्यासह 
पालकांना प्रवेशासाठी आज धावाधाव करावी लागली. निकाल जाहीर होऊन दोन दिवस पूर्ण होण्यापूर्वीच काही शाळांमधील प्रवेश बंद झाला. त्यामुळे चांगले गुण मिळालेल्या मुलांना इच्छुक शाखेमध्ये प्रवेश मिळवणे मुष्किल बनले. 
यंदा राज्यात दहावीचा विक्रमी निकाल लागल्याने पणजी व आसपासच्या परिसरातील शाळांच्या बहुतेक उच्च माध्यमिक हायस्कूलच्या 
व्यवस्थापनाने विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी किमान ८५ गुणांची टक्केवारी ठेवली होती. बहुतेक या शाळांनी एक - दोन आठवड्यापूर्वी 
प्रवेशपुस्तिका विक्रीसाठी खुल्या केल्या होत्या. मात्र, त्यासंदर्भातची माहिती काही विद्यार्थी तसेच पालकांपर्यंत पोहोचली होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रवेशपुस्तिका विक्रीस उपलब्ध केल्या जातील व प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज अनेक पालक वर्गाचा होता. मात्र, काल व आज या दोन दिवसांतच बहुतेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या काही विद्यार्थ्यांवर इच्छेविरुद्ध इतर शाखेत प्रवेश घेण्याची नामुष्की आली आहे. 
कुजिरा - बांबोळी येथील शिक्षण संकुलामध्ये असलेल्या उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तसेच पालकांची बरीच गर्दी झाली होती. कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर तसेच निर्जंतुकीकरण हे सक्तीचे असल्याने प्रवेशाची प्रक्रियाही धिम्यागतीने सुरू होती. या संकुलामध्ये विज्ञान, वाणिज्य व कला अशा तीन शाखेसाठी अकरावीत प्रवेश देणारी उच्च माध्यमिक हायस्कूल आहेत. काहींनी अगोदरच प्रवेशपुस्तिका नेऊन त्या भरून आणून दिल्या तर काही विद्यार्थी व पालकांनी प्रवेश घेण्यासाठी कालच प्रवेशपुस्तिका विकत घेऊन त्या भरून देण्यासाठी धावाधाव करताना दिसत होते. 
कुजिरा - बांबोळी येथील शिक्षण संकुलामध्ये असलेल्या उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तसेच पालकांनी प्रवेशपुस्तिका घेण्यास तर काहीजण मिळालेल्या प्रवेशाचे शुल्क भरण्यास लांबपर्यंत रांगा लावल्या होत्या. प्रवेशासाठी टक्केवारी निश्‍चित करण्यात आल्याने विद्यार्थी व पालक प्रवेश कोठे मिळण्याची शक्यता आहे, याचा अंदाज घेत प्रवेशासाठी रांगा लावत होते. त्यामुळे पाल्याबरोबर पालकांचीही धावपळ उडताना दिसत होती. 
विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी निश्‍चित केलेल्या गुणांची टक्केवारी बहुतेक शाळांमध्ये ८५ टक्के असल्याने ८० ते ८४ टक्के गुण मिळवलेल्या पाल्याबरोबर पालकही प्रवेश मिळेल की नाही याच्या तणावात दिसत होते. दहावीत ८० पेक्षा अधिक टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा यासाठी धडपड करत असतात. त्यासाठी पणजीतील उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये प्रवेश मिळत नसल्यास पर्वरी किंवा म्हापसापर्यंत प्रयत्न करण्याची धावपळ ही सुरूच होती. काही हायस्कूलनी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस असल्याचे नमूद केल्याने आज प्रवेशपुस्तिका घेऊन गेलेले काहीजण प्रवेशासाठी परतलेच नाही. कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी हायस्कूलच्या व्यवस्थापनाने काही नियम तेथे केले होते त्यामुळे रांगेत उभे राहताना गोंधळ उडताना दिसत होता. प्रवेशपुस्तिका खरेदीसाठी तसेच प्रवेशासाठी वेगवेगळ्या रांगा असल्या तरी त्याची माहिती देण्यासाठी कोणी नसल्याने उपस्थित पालकांमध्ये रांगेत उभे राहण्यावरून ‘तू तू मै मै’ होत होते. ज्यांनी अगोदरच प्रवेशपुस्तिका नेल्या होत्या त्यांनी कालच अर्ज जमा करून निश्‍चित टक्केवारीचे निकष पूर्ण करून प्रवेश घेतला होता. हा प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर दिला जात होता. त्यामुळे जे प्रवेशपुस्तिका निकालापूर्वी नेऊ शकले नाही त्यांची धावपळ उडाली तर काहींना वेळेत अर्ज जमा करता न आल्याने ८५ टक्केहून अधिक गुण असूनही प्रवेश मिळाला नाही. 
 

 
 

संबंधित बातम्या