माडाच्या जागेत परेश बागी यांना सापडली जैवप्रकाशमय अद्भूत अळंबी

पद्माकर केळकर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर म्हणाले, जसे काजवे रात्रीचे चमकतात तशाच प्रकारची ही हिरव्या रंगाची किरणे उत्सर्जीत करणारी अळंबी आहे. त्यामुळे पश्‍चिम घाटातील परिसरात दिसणारा निसर्गाचा अद्भुत मनमोहक असा चमत्कारच आहे.

वाळपई: सत्तरी तालुक्यातील सावर्शे गावात परेश बागी यांना माडाच्या जागेत अद्भूत अशी जैवप्रकाशमय अळंबी (Bioluminescent Mushrooms) सापडली आहे. 

परेश बागी यांनी अभियांत्रिकी पदवी संपादन केली असून ते रात्रीचे बागायतीत माडाच्या जागेत फिरत असताना ही अळंबी दिसली. परेश यांना निसर्गातील घटनांचे छायाचित्रण करण्याचा छंद आहे. माडाच्या जागेत फिरत असताना वेगळ्या प्रकारची हिरव्या रंगाच्या प्रकाश टाकणारी नैसर्गिक अळंबी दिसल्यावर बागी यांनी अळंबीचे छायाचित्र टिपले.

याबाबत पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर म्हणाले, जसे काजवे रात्रीचे चमकतात तशाच प्रकारची ही हिरव्या रंगाची किरणे उत्सर्जीत करणारी अळंबी आहे. त्यामुळे पश्‍चिम घाटातील परिसरात दिसणारा निसर्गाचा अद्भुत मनमोहक असा चमत्कारच आहे. प्राथमिक अवस्थेत अळंबीचे सुफलीकरण सुरू होते. त्यावेळी ती चमकणारी दिसून येते. या अळंबीवर जागतीक पातळीवर सखोल संशोधन सुरू आहे. हे संशोधन म्हणजे संधीच म्हणावी लागेल. मायसेनिया प्रजातीतील ही अळंबी आहे. या अळंबीच्या नैसर्गिक प्रक्रियेत विकर प्रकाशमान होत जातात. ही चकाकणारी अद्भूत अळंबी सत्तरीत आढळल्याने येथे जैवसंपदा कितीशाच विविध प्रकारांनी बहरलेली आहे, याची प्रचिती येते आहे. श्रावण महिन्यात सत्तरी तालुक्यात काजू बागायतीत, जंगल परिसरात अळंबी आढळते, जी खाण्यासाठी लोकांचा जास्त कल असतो. 

पश्‍चिम घाटातील दुर्मीळ प्रजाती
होंडा सत्तरी येथील अभ्यासक आसावरी कुलकर्णी म्हणाल्या, ही स्वयं प्रकाशीत बुरशी आहे. जी पश्‍चिम घाटात सापडणारी एक दुर्मीळ प्रजाती आहे. अशा प्रकारच्या बुरशीच्या एकूण ५० जाती जगात सापडतात. त्यापैकी ‘मयसिना’ नावाची ही जात आपल्या गोव्यात सापडते. एका विशिष्ट प्रकारच्या प्रथिन विकराच्या स्त्रावामुळे बुरशी रात्रीच्यावेळी हिरवट निळा प्रकाश सोडते. या बुरशीसाठी आपलं तापमान अनुकूल अस आहे. ९८ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेत या बुरशीला फुटवे फुटतात. घनदाट जंगलातही ही दुर्मीळ अळंबी सापडते. लाकडाच्या ओंडक्यावर, झाडावर ही वाढतात. पावसात कधी-कधी अख्खे झाडच पेटल्याचा भास होतो. म्हादई, महावीर अभयारण्य, सांगे, सावर्डे, सकोर्डा, सुर्लाच्या, केरीच्या जंगलात ती सापडतात. सावर्शे येथे सापडली ही विशेष म्हणावे लागेल. कारण पहिल्यांदाच ही लोकवस्तीत आणि माडावर सापडली आहे. नाहीतर हे सहसा घनदाट जंगलात सापडतात. ही प्रक्रिया कशी होते याचे आकलन अजूनही शास्त्रज्ञांना झालेले नाही. पण प्रयोग शाळेत याच यशस्वी culturing झालं आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या